

वडोदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नव्याने सुरू झालेल्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’वरून विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली. “प्रगतीची कामे होऊनही टीकाकार नेहमी एखाद्या ‘नाराज फुफा’सारख्या (रागावलेले मेहुणे/काका) तक्रारी करत राहतील आणि खोटे मुद्दे शोधत राहतील,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज प्रचाराचा उल्लेख त्यांनी ‘झूठ की गूंज’ (खोट्याचा पडसाद) असा केला.
नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ते उत्तर प्रदेशातील दादरी यांना जोडणाऱ्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे उद्घाटन आणि प्रकल्पाची पूर्णता जाहीर करताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या कामाच्या वेगाचे कौतुक करत, पूर्वीच्या काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या संथ कारभारावर कडक शब्दांत टीका केली. २०१४ मध्ये तुमच्या आशीर्वादाने मी दिल्लीत पोहोचलो आणि आम्ही या प्रकल्पाला गती देण्यास सुरुवात केली. आज या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे काम पूर्ण झाले आहे.
पूर्व आणि पश्चिम फ्रेट कॉरिडोर आता देशाच्या व्यापार आणि प्रवासाचा मुख्य कणा बनत आहेत, मालगाडीचा १०० किमीचा प्रवास जो पूर्वी ६.५ तास घ्यायचा, तो आता अर्ध्याहून कमी वेळेत पूर्ण होतो. ट्रकला लागणारा ३० तासांचा वेळ आता १० ते १२ तासांवर आला आहे, २००४ मध्ये कल्पना मांडली गेली आणि २००६ मध्ये कंपनी स्थापन झाली, तरी २०१४ पर्यंत फायली अडकून पडल्या होत्या, यंदाचे रेल्वे बजेट २.७५ लाख कोटी रुपये असून, गेल्या १० वर्षांत ५०,००० आधुनिक रेल्वे डबे तयार करण्यात आले आहेत.
अलीकडेच जेएनपीटी ते वडोदरा दरम्यान चालवण्यात आलेल्या ‘डबल-स्टॅक कंटेनर’ मालगाडीचे उदाहरण देत मोदी म्हणाले, एकाच फेरीत २५० हून अधिक ट्रक इतका माल वाहून नेला गेला. आता हे ‘नाराज फुफाजी’ ओरडू लागतील ट्रकचालकांचे काय होणार, ज्यांनी ट्रक खरेदी केले त्यांचे काय, आता फुफाजींना तक्रार करायला नवीन मुद्दा मिळाला आहे.
झूठ की गूंज :
‘नाराज फुफा’ हा सांस्कृतिक संदर्भ वापरत मोदींनी स्पष्ट केले की, ज्याप्रमाणे कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमात लहानसहान गोष्टींवरून विनाकारण नाराज होते, तसेच विरोधकही देशाच्या प्रगतीवर तक्रारी करत असतात. काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ (विद्यार्थ्यांचा आवाज) या मोहिमेची खिल्ली उडवताना मोदी म्हणाले, ही झूठ की गूंज असून खोट्याचा प्रसार करणारे तुम्हाला प्रत्येक चौकात मिळतील, पण भारतातील तरुण सत्याच्या हुंकाराने पुढे जात आहेत.