Mumbai : मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरीचा Video व्हायरल
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालय दालनातील लाच प्रकरणाच्या ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ गुरुवारी समाज माध्यमात व्हायरल झाला. या व्हिडिओत लाच घेताना पकडला गेलेला लिपीक राजेंद्र ढेरंगे हा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडे ५० हजारांची लाच मागताना दिसत आहे. व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने ढेरंगेला ५० हजार रुपये दिल्याचेही कळते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी झिरवाळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंगेला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. ढेरंगे याने औषध दुकानाच्या परवान्याचे निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यामधील ३५ हजार रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
यापूर्वीही ढेरंगेने अशा प्रकारे पैसे उकळले असू शकतात, असा संशय लाच प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बळावला आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयातील जो लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडिओ जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यानचा असल्याचे समजते.
ढेरंगेने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय
दुसऱ्या एका प्रकरणात अशीच लाच एका तक्रारदाराकडे राजेंद्र ढेरंगे यानी मागितली होती. पैसे द्यायची इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पैसे घेताना ढेरंगेला पकडले. अशाच प्रकारे ढेरंगे याने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आहे. विभागाच्या कारवाईनंतर हे स्टिंग ऑपरेशन आता बाहेर आले आहे.

