अरुंद रस्ते, गल्लीबोळ होणार कचरामुक्त; गोवंडीत ई ऑटो रिक्षा यशस्वी

अरुंद रस्ते गल्लीबोळ आता कचरामुक्त होणार आहे. गोवंडी परिसरातील झोपडपट्टीत घरोघरी कचरा संकलनासाठी 'ई ऑटो रिक्षा धावत आहेत.
अरुंद रस्ते, गल्लीबोळ होणार कचरामुक्त; गोवंडीत ई ऑटो रिक्षा यशस्वी

मुंबई : अरुंद रस्ते गल्लीबोळ आता कचरामुक्त होणार आहे. गोवंडी परिसरातील झोपडपट्टीत घरोघरी कचरा संकलनासाठी 'ई ऑटो रिक्षा धावत आहेत. ‘ई ऑटो रिक्षा’च्या वापरामुळे कचरा संकलन सोपे होतानाच वाहतुकीसाठीही हा पर्याय सोयीचा ठरत आहे.

घरगुती कचरा संकलनावर भर देतानाच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीबहुल भागात स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या ‘एम पूर्व’ विभागात पहिल्यांदा ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आणखी भागात अशा स्वरूपाची वाहने वापरण्यात येतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागात देखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येत आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या भागात मोठ्या जीपसारखी वाहने नेण्यासाठी तसेच वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी आकाराने छोट्या ई ऑटो रिक्षांचा वापर करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार तीन ई ऑटो रिक्षांचा वापर सध्या ‘एम पूर्व’ विभागात करण्यात येत आहे.

प्रदूषणमुक्त कार्बन उत्सर्जन होत नाही!

‘ई व्हेईकल’मुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच बॅटरी पॉवर्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर होत असल्याने कोणतेही इंधन ज्वलनाची प्रक्रिया या वाहनांसाठी होत नाही. परिणामी कार्बन उत्सर्जन होत नाही. ई वाहने ही चार्जिंग करण्यासाठी चौकीच्या ठिकाणी सहज वापराचा पर्याय आहे. तसेच या वाहनांपासून कोणताही आवाज निर्माण होत नाही. पारंपरिक इंजिनपेक्षा या मोटरसाठी देखभाल आणि दुरुस्तीचा येणारा खर्च तुलनेत कमी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in