भाजपला धक्का! अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश; दादा भुसेंविरोधात उतरणार मैदानात

भाजपला धक्का! अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश; दादा भुसेंविरोधात उतरणार मैदानात

भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे

गेले अनेक दिवस अद्वय हिरे हे शिवसेना ठाकरे गटात जाणार का? अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला. हा फक्त भाजपलाच नव्हे तर शिवसेना शिंदे गटासाठीसुद्धा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटात प्रवेश करताच त्यांनी दादा भुसेंविरोधात दंड थोपटले आहे.

अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे नाशिकमध्ये दादा भुसे यांना चांगला फटका बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी बोलताना भाजपवर कडाडून टीकादेखील केली. ते म्हणाले की, "आमच्या मतदारसंघामध्ये भाजपचे अस्तिव नव्हते. ते आम्ही निर्माण केले. पण ५० गद्दार भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आणि भाजपला आमची गरज उरली नाही. माझ्या मतदार संघात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण भाजपने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. जो पक्ष शेतकऱ्यांना वाचवू शकत नाही, त्या पक्षाचा मी त्याग केला."

यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "बरे झाले गद्दार गेले, त्यामुळे आम्हाला हिरे सापडले. त्यांनी सांगितलेला भाजपचा त्रास २५ ते ३० वर्ष आम्हीही भोगला असून आम्ही त्यांना पालखीत बसून फिरवले. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली, ती भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही नव्हे तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली. लवकरच मालेगावमध्ये सभा घेऊ."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in