नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक रद्द : वांद्रेकरांत नाराजी

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे स्थानकाचे खांब उभारण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे म्हटले
नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक रद्द : वांद्रेकरांत नाराजी
Published on

मुंबर्इ : एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो २बी लार्इनवरील (अंधेरी पश्चिम ते मंडाले) नॅशनल कॉलेज स्थानक रद्द केल्यामुळे वांद्रेकरांत नाराजी पसरली आहे. हे मेट्रो स्थानक पूर्णपणे रद्द न करता नव्या जागी उभारावे, अशी वांद्रेकरांची मागणी होती.

एमएमआरडीएच्या या निर्णयामुळे या भागातील आमदार आशिष शेलार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी या प्रकरणातून माघार घेतली आहे. मेट्रो स्थानक प्लॅनमधील लोकेशनच्या जागीच पुन्हा उभारण्यात यावे. हे ठिकाण जीवन किरण बंगल्याच्या जवळ असून त्यामुळे साधू वासवानी बाग पूर्णपणे वाचते. यामुळे प्राधिकरणाने हे स्थानक रद्द न करता केवळ जागा बदलावी, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. या भागात तब्बल चार कॉलेजेस आहेत. परिणामी हे स्थानक रद्द झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.

एमएमआरडीएसोबत झालेल्या एका बैठकीत स्थानिक रहिवाशांनी प्राधिकरणाने स्थानकाच्या व्यवहार्यतेचे सर्वेक्षण केले होते का, असा प्रश्न विचारला आहे. तेव्हा प्रत्येक स्थानकासाठी व्यवहार्यता सर्व्हे करण्यात आला नसून संपूर्ण कॉरिडॉरसाठी करण्यात आला होता, असे उत्तर प्राधिकरणाने दिले आहे. नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानकामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर लिंकिंग रोडला शॉपिंगसाठी जाणाऱ्यांना पण फायदा होणार आहे. नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक रद्द झाल्यामुळे वांद्रे आणि खार मेट्रो स्थानकांमधील अंतर दोन किती झाले आहे. याबाबत स्थानिक आमदार आशिष शेलार मूग गिळून बसल्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक आधीच्या जागी नेण्यामागील कारण देताना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे स्थानकाचे खांब उभारण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in