
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षेत अर्थात स्काॅलरशिप मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या इतिहासात या परीक्षेत प्रथमच तब्बल पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
या यशवंत विद्यार्थ्यांमध्ये (१) खुशी महेश कोकर (रमाबाई सहकार नगर महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २, मुंबई उत्तर), (२) दक्षता मनोहर ऐलमकर (सिटी आफ लास एंजलिस महानगरपालिका मराठी शाळा, मुंबई दक्षिण), (३) वेदांती मेघश्याम मोरे (गोशाळा महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक १, मुंबई उत्तर), (४) रेहमान शफिक शेख (देवनार वसाहत महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २, मुंबई उत्तर), (५) उमरहुसेन जियाउद्दीन शेख (अंधेरी पश्चिम मुंबई पब्लिक स्कूल) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती’ ही संपूर्ण भारतात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा आहे. महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येते. गत वर्षी २१ डिसेंबर २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात आली. पालिका शाळांतील इयत्ता आठवातील ४० विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यातील एकूण पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत (मेरीट) झळकले आहेत. या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महापालिकेचे प्रथमच विद्यार्थी परीक्षेस बसवले होते, पहिल्याच वेळी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये येऊन घवघवीत यश मिळवले आहे. या यशाने हे पुनश्च अधोरेखित केले की बृहन्मुंबई महापालिकेचे विद्यार्थी राज्यस्तरावरील मुलांसोबत केवळ स्पर्धेत उतरतात असे नाही, तर या परीक्षेवर महापालिकेचा ठसा उमटवला आहे.
गळती रोखण्यासाठी शिष्यवृत्ती योजना!
इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, तसेच शिक्षणासह आर्थिक सहाय्य मिळावे, विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आणि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात येते.
वर्षांला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती!
केंद्र शासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय (नवी दिल्ली) यांनी सन २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता ८ वी) ही परीक्षा सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर एकाच दिवशी एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा एक हजार रुपये (वार्षिक बारा हजार रुपये) इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. आता या पाच विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षे म्हणजे इयत्ता १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी इयत्ता ९ वी व ११ वी मध्ये किमान ५५ टक्के तसेच इयत्ता दहावीत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.