
नवी मुंबई : नामांतराच्या मुद्द्यावरून गाजलेल्या बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. देशातील सर्वात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतिपथावरील कामाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद 'बॅग क्लेम सिस्टिम' विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिली. सद्यस्थितीत विमानतळाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडणार, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
विमानतळावरील कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या सद्यःस्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, "नवी मुंबई विमानतळ हे केवळ एक प्रवासाचे ठिकाण न राहता, हे 'फ्युचर रेडी' एअरपोर्ट असेल. इथे प्रवाशांना बॅगेज ट्रॅकिंगसाठी ३६० डिग्री बारकोड स्कॅनिंगची सुविधा असेल. जगातील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या बॅगेज सिस्टीमपैकी एक याठिकाणी कार्यान्वित केली जाणार आहे. विमानतळावर एक किमीपर्यंत चालण्याऐवजी 'ट्रॅव्हलर' सुविधा' (ऑटोमेटेड वॉकवे) देण्यात येणार आहे, जेणेकरून वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना कोणतीही अडचण भासणार नाही."
या भव्य प्रकल्पाच्या उभारणीत दररोज १३ ते १४ हजार कामगार झटत असून, ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या विमानतळाचे दोन्ही रनवे पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर वर्षाला तब्बल ९ कोटी प्रवाशांसाठी सेवा देता येणार आहेत. मुंबई विमानतळाच्या तुलनेत हे विमानतळ अधिक विस्तृत आणि आधुनिक असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
'वॉटर टॅक्सी', विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्कची सुविधा
या विमानतळावर पोहोचण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील. अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेनची सुविधा दिली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर थेट पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. याशिवाय जलमार्गाद्वारे 'वॉटर टॅक्सी'ची सेवा देखील कार्यान्वित केली जाणार आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल, खोपोली, कल्याण या परिसरातील नागरिकांना विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मार्गिका व विशेष कनेक्टिव्हिटी नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत 'ऑफ शोअर एअरपोर्ट' उभारणार
भारताला 'मेरीटाईम पॉवर' बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट' होणार आहे, त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे.