विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; 'दि. बा. पाटील पायी दिंडी' नवी मुंबईत धडकणार

दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. चार जिल्ह्यांतील भूमिपुत्र एकवटले असून, २२ डिसेंबरपासून भिवंडी येथून ‘दि. बा. पायी दिंडी’ काढून थेट विमानतळावर धडक देण्यात येणार आहे.
विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; 'दि. बा. पाटील पायी दिंडी' नवी मुंबईत धडकणार
विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; 'दि. बा. पाटील पायी दिंडी' नवी मुंबईत धडकणार
Published on

विजय मांडे/ कर्जत

दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे, या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. चार जिल्ह्यांतील भूमिपुत्र एकवटले असून, २२ डिसेंबरपासून भिवंडी येथून ‘दि. बा. पायी दिंडी’ काढून थेट विमानतळावर धडक देण्यात येणार आहे. या पायी दिंडीचा सविस्तर मार्ग आक्रोश दिंडीचे समन्वयक निलेश पाटील यांनी सभेत जाहीर केला.

या मागणीसाठी राज्य सरकारने ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मात्र केंद्राकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांनी विविध आंदोलने उभी केली असून, विमानतळावरून या महिन्यात उड्डाण सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक आक्रमक झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी हातात घेतले असून, कार रॅलीनंतर आता ‘आरपारची लढाई’ म्हणून दि. बा. पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. ही दिंडी भिवंडीतील मानकोली नाका येथून सुरू होऊन ऐरोली मार्गे ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्गाने विमानतळ परिसरात पोहोचणार आहे.

नवी मुंबईतील दोन दिवसांच्या मुक्कामाची संपूर्ण व्यवस्था स्थानिक भूमिपुत्रांनी केली असून, मार्गात पिण्याच्या पाण्याची व आवश्यक सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. खासदार सुरेश म्हात्रे तसेच समाजातील विद्यमान व माजी पदाधिकारी स्वतः पायी दिंडीत सहभागी होणार आहेत.

पायी दिंडीचा नियोजित मार्ग

आक्रोश रॅलीचे समन्वयक व नवी मुंबई आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी सकाळी मानकोली नाका, भिवंडी येथून पायी दिंडी निघणार असून सुरुवातीला किमान २५ हजार भूमिपुत्र सहभागी होतील. दुपारच्या भोजनासाठी ठाण्यातील खारेगाव येथे विसावा घेतला जाईल. त्यानंतर सायंकाळी सुमारे १५ किमी अंतर पार करून ऐरोली येथे मुक्काम केला जाईल. दिंडीत सहभागी महिलांसाठी सायंकाळी घरी परतण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी ऐरोलीहून दिंडी पुन्हा मार्गस्थ होऊन १५ किमी अंतर पार करत सीबीडी बेलापूर येथे मुक्काम करेल. २४ डिसेंबर रोजी अंतिम टप्प्यात रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यातील भूमिपुत्र हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन विमानतळ परिसरात एकत्र येणार आहेत.

गेल्या १० वर्षांपासूनची मागणी

शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतला होता. तसेच स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध, कुळ कायदा आणि सामाजिक सुधारणांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे दि. बा. पाटील हे माजी खासदार व विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते होते. नवी मुंबई शहराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान असल्याने, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे.

सरकारकडून निर्णयाची अपेक्षा

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला असला, तरी केंद्र सरकारकडून गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे भूमिपुत्र संतप्त झाले असून, आंदोलन अधिक तीव्र होत आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in