मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील जैन मंदिरावर अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. घाडगे यांची नियुक्ती २१ जुलै रोजी पाणीपुरवठा प्रकल्प विभागात उपप्रमुख अभियंता पदावर करण्यात आली आहे. जैन मंदिरावर कारवाई केल्यामुळे त्यांच्याविरोधातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे त्यांची पदोन्नती रोखण्यात आली होती.
दरम्यान, न्यायालायने संबंधित अनधिकृत मंदिरावर कारवाई योग्य असल्याचे सांगितल्यावर त्यांना पदोन्नती देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, त्यांना के पूर्व येथील सहाय्यक आयुक्त पदापासून जाणूनबुजून दूर ठेवल्याचा आरोप प्रशासनावर होत आहे. मुंबई महापालिकेने विलेपार्ले पूर्व येथील कांबळी वाडी परिसरा येथे असलेल्या जैन मंदिरातील अनधिकृत बांधकामाविरोधात एमआरटीपी कायद्यातील तरतुदींनुसार पाडकामाची कारवाई केली होती. त्यामुळे सहाय्यक आयुक्त घाडगे यांना प्रशासनाने तडकाफडकी बदली केली होती. परंतु, पालिकेने केलेली कारवाई योग्यच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने ९ जुलै रोजी दिला होता. परिणामी, सहाय्यक आयुक्तांनी केलेली कारवाई बरोबर होती यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे घाडगे यांना पुन्हा के पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावर सन्मानाने नियुक्त करावे, तसेच त्यांची रोखलेली पदोन्नती त्यांना द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने केली होती.