
नवनीत राणा व रवी राणा यांच्या खार येथील घरात नियमबाह्य बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तर बुधवारी पालिकेच्या एच. पश्चिम विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी राणा दाम्पत्याच्या घरी पाहणी करण्यासाठी गेले; मात्र घराला टाळे असल्याने अधिकाऱ्यांना कुठलीही पाहणी न करता माघारी परतावे लागले. दरम्यान, इमारतीतील सुरक्षारक्षकाला कोणी आल्यास कळवावे, अशी सूचना केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
खार पश्चिम, १४व्या रस्त्यावर ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्य यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले, तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे.
इमारतीतील अनेक घरांमध्ये अवैध बांधकामे करण्यात आली असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. काही घरांना याआधी नोटिसा पाठवल्या आहेत. राणा दाम्पत्याच्या घरालाही नोटीस पाठवली होती. त्यानुसार बुधवारी पालिकेचे पथक त्यांच्या घरी गेले. राणा कुटुंबीय घरी नसल्याने दरवाजा उघडला गेला नाही, त्यामुळे पथक माघारी फिरले आहे. यानंतर ज्यावेळी राणा कुटुंबीय कळवतील, त्यानंतर आम्ही पुन्हा तपासणीला येऊ, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
जेएनपीटीला जोडण्यासाठी ३,५०० कोटींचे पूरक रस्ते