नवाब मलिकांची प्रकृती ढासाळली ; देशमुख, राणांचा उपचारासाठी सुटकेचा अर्ज दाखल

नवाब मलिकांची प्रकृती ढासाळली ; देशमुख, राणांचा उपचारासाठी सुटकेचा अर्ज दाखल

विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात असलेले राजकीय कैदी आजारी पडले आहेत. मनीलाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरून तेढ निर्माण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी मणक्यांचा त्रास होऊ लागल्याने उपचारास परवानगी मिळावी, असा अर्ज कारागृह प्रशासनाकडे केला आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे खांदेदुखीवर उपचारासाठी परवानगी मागितली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपांखाली अटकेत आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक हे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीसोबत केलेल्या व्यवहारातून अफरातफर केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे ध्येय घेऊन अमरावतीहून मुंबईत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा शिवसैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर अटकेत आहेत. हे तीनही नेते कोणत्या न कोणत्या शारीरिक व्याधीने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी कोर्टात उपचारासाठी अर्ज केला आहे.

नवाब मलिक यांची जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांना ‘ईडी’ने अटक केल्यानंतर आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. सोमवारी अचानक त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला. कारागृहात ते पडल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवरून जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच रिमांडला विरोध करण्यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. स्टेज दोनच्या क्रॉनिक किडनी रोगामुळे यांना पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार आहे. तुरुंगात यांना वेदनाशामक औषधे देण्यात आली आहेत; मात्र ही औषधे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगली नाहीत. सर जे जे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध दिलेले नाही. मलिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांना आजाराचा क्रमिक अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले होते. याआधीही मलिक यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसरीकडे, नवनीत राणा यांनी आपल्याला तातडीने उपचारास परवानगी मिळवी, असा अर्ज भायखळा कारागृहाकडे दाखल केला आहे. राणा यांना मणक्याच्या व्याधीचा त्रास असून कारागृहात जास्त वेळ जमिनीवर बसून आणि झोपून हा त्रास आणखी बळावला आहे. त्यांना २७ एप्रिलला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे राणा यांचे सिटिस्कॅन करण्यात यावे, असे सांगितले होते. याबद्दल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आता वेदना असह्य झाल्याने नवनीत राणा यांचे सिटिस्कॅन करण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्याबाबत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांनी वकिलांमार्फत केली आहे. याबाबतच्या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष आणि राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in