

मुंबई : आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवण्याच्या ‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला नागपूरचे राजे मुधोजीराजे अजितसिंगराव भोसले यांच्यासह अन्य नऊ जणांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दाखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी ९ डिसेंबरला निश्चित केली आहे.
ॲड. आशीष गायकवाड यांनी शुक्रवारी सकाळी ही याचिका मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या पुस्तकातील ‘आकृती ३.११’ हा नकाशा हटवला आहे. हा नकाशा इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याची व्याप्ती दर्शवतो. त्यात मराठ्यांचे साम्राज्य तंजावरपासून पेशावरपर्यंत पसरल्याचे दिसते.