

मुंबई : इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटवण्याच्या ‘एनसीईआरटी’च्या निर्णयाला मराठा राजघराण्यांच्या वंशजांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या याचिकेवर लवकरच मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नागपूरचे राजे मुधोजीराजे अजितसिंगराव भोसले यांच्यासह अन्य नऊ जणांनी ॲॅड. आशिष गायकवाड यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे.
एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या पुस्तकातील ‘आकृती ३.११’ हा नकाशा हटवला आहे. हा नकाशा इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याची व्याप्ती दर्शवतो. त्यात मराठ्यांचे साम्राज्य तंजावरपासून पेशावरपर्यंत पसरल्याचे दिसते. राजस्थानच्या काही माजी राजघराण्यांच्या विरोधानंतर ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या काळात हिंदी, उर्दू आणि इंग्रजी आवृत्त्यांमधून हा नकाशा वगळण्यात आला आहे, असे जनहित याचिकेतून न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. नकाशा हटवण्यापूर्वी कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रांचा किंवा तज्ज्ञ समितीचा सल्ला घेण्यात आला नव्हता.