
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली गेली. तसेच, त्यामुळे राजकीय वातावरण तर तापलेच होते, पण राज्यातील अनेक ठिकाणी याचे कडाडून विरोध झाले. नुकतेच धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबाने संत तुकारामांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली. यावर प्रतिक्रिया विचारले असता विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, "सध्या महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात नव्या कायद्याची गरज आहे. येत्या अधिवेशनात या संदर्भात मागणी करेन."
पुढे ते म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबा यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आहे. त्यामुळे मी व्यथित झालो. राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. आम्ही आगामी अधिवेशनात बेताल वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यासाठी एक कायदा करावा, अशी मागणी करणार आहोत. या वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र महाराज बागेश्वर बाबा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
"महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक सुरु आहे. यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. महारापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बोलत असतात, यामुळे राज्यात वातावरण खराब होते आहे. कोणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, तर कोणी शाई फकण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांवचा अपमान होऊ नये यासाठी कायदा केलाच पाहिजे," असे मत त्यांनी यावेळी मांडले.