
"माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असून या चर्चांना काहीही अर्थ नाही," असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व्यक्त केले. गेले काही दिवस अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावरून अखेर आज माध्यमांसमोर त्यांनी स्वतः आपले मत व्यक्त केले. "जिवंत जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीचेच काम करत राहणार आहे. आता या चर्चांना पूर्णविराम लावा. आता काय मी ॲफिडेव्हिटवर लिहून देऊ का?" असा संताप त्यांनी व्यक्त केल्या.
"राष्ट्रवादीमध्ये अनेक चढउतार आले पण सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून पक्षातच राहणार आहोत. काही राष्ट्रवादीचे आमदार हे मला कामासाठी भेटण्यास आले होते. तर याचा वेगळा अर्थ काढू नये," असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. "१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार आहोत. "प्रत्येकाने आपले काम करत रहा. आपापल्या भागात पक्ष कसा वाढवता येईल? यासाठी प्रयत्न करा," असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.