Ajit Pawar : मी माझ्या मतांवर ठाम, मी कोणाचाही अनादर केलेला नाही; अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

विधानसभेमध्ये जेव्हा बोललो तेव्हा सगळे शांत होते, त्यानंतरच का विरोध करण्यात आला? सर्व घडवणारा मास्टरमाईंड तिथे उपस्थित नव्हता, अजित पवारांचा (Ajit Pawar) टोला
Ajit Pawar : मी माझ्या मतांवर ठाम, मी कोणाचाही अनादर केलेला नाही; अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी, 'छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर (Dharmveer) नव्हते तर स्वराज्यरक्षक होते' असे विधानसभेत वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर भाजप (BJP) आणि शिंदे गटासह अनेक हिंदू संघटनानी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आंदोलने केली, मोर्चे काढले. याबद्दल अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. अजित पवार आपल्या मतांवर ठाम असून 'धर्मवीर' मानावे किंवा स्वराज्य रक्षक मानावे, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, असे स्पष्ट केले.

मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार म्हणाले की, मागच्या वर्षी मार्चमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी रुपये तसेच महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ इतर उपक्रम राबवण्याची घोषणा अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर केली होती. त्यामुळे त्यांचा अनादर करणे, हा प्रश्नच उद्भवत नाही. मी कधीच महापुरुषांबद्दल चुकीचे बोललो नाही. 'स्वराज्य रक्षक' म्हणालो कि त्यात सगळंच आलं. त्यामुळे मी माझ्या मतांवर ठाम आहे." पुढे ते म्हणाले की, "धर्मवीर ही उपाधी कोणाला मिळाली? हे तुम्ही इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण 'धर्मवीर' आहेत. काहींचे तर चित्रपट निघाले आहेत. आता तर धर्मवीर भाग २ येतो आहे. स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही,"

पुढे भाजपवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, "भाजपला आपल्या विरोधात वक्तव्य करुन राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपचे मंत्री, राज्यपाल, आमदारांनी महापुरुषांचा अवमान करणारी अनेक बेताल वक्तव्य केली आहेत. त्यांनी खरे तर माफी मागायला हवी. मी महाराजांबद्दल काही चुकीचे बोललो नाही. महाराजांबद्दल कुठेही अपशब्द वापरले नाहीत. जेव्हा मी विधानसभेत हे सर्व काही बोललो तेव्हा सगळे शांत होते. मग, त्यानंतरच हा वाद का निर्माण झाला. कारण, त्यावेळेची या सगळ्यांचा मास्टरमाईंड उपस्थित नव्हता."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in