

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया थंडावली असली तरी त्यावरून सध्या जोरदार टोलवाटोलवी सुरू आहे. विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? याचा खुलासा किंवा माहिती कळाली, तर मला बोलता येईल. मात्र त्यावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही बोलू, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणाबाबत भाजपला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या चर्चेवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही एनडीमध्ये सध्या भाजपसोबत सत्तेत आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी ज्यांना सोबत यायचे, त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपने कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा, असे सांगितले नाही. आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो. भाजप मित्रपक्ष म्हणून आमच्या निर्णयासोबत आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी काही वेगळी भूमिका नाही.”
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काय बोलले, याबद्दल मी काही बोलणार नाही. पण इतर सहकाऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, ते अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच सुरू झाले. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? याचा खुलासा झाला तर मलाही आमची भूमिका मांडता येईल,” असेही तटकरे म्हणाले.
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले, मग पवारही यावेत. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काय बोलणे झाले, कोणाबरोबर झाले, हे माझ्यासहित कोणालाही माहित नाही. मुख्यमत्र्यांनीही सांगितले की, त्यांच्याशी अजित पवारांनी यासंदर्भात काहीही सांगितले नव्हते. तसेच, आम्हालाही याची कल्पना नाही. सध्या आम्ही भाजपबरोबर सत्तेत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसहित भाजपच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावे लागेल. सरकारमधून बाहेर पडायचे असेल तर भाग वेगळा,” असे छगन भुजबळ म्हणाले.
काहीतरी गडबड नक्कीच आहे - भुजबळ
देशात आणि राज्यात असे अनेक अपघात झाले, मात्र अजितदादांचा झालेला हा अपघात मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. मी त्या ठिकाणचे काही सीसीटीव्हीदेखील बघितले, त्यामध्ये सरळ येत असलेले विमान एकदम पलटी झाले, त्यामुळे कुठेतरी काहीतरी गडबड आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, त्यानंतर काहीतरी माहिती समोर येईल, परंतु सोन्यासारखी माणसे गेली, ती परत कशी येतील?, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी नाशिकमधील शोकसभेत शंका उपस्थित केली.
चर्चेत ते नव्हतेच - शरद पवारांचा फडणवीसांना टोला
विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली असती तर अजितदादांनी मला सांगितले असते. ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यावर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिले. “विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार?,” अशा एका वाक्यात त्यांनी फडणवीसांच्या दाव्याची पोलखोल केली.