आज महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चोथा दिवस होता. आजचा दिवस हा महाविकास आघाडीची महत्त्वाचा ठरला. कारण, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात गोंधळदेखील घातला. याचे कारण म्हणजे भाजप आमदारांनी शरद पवारांचा केलेला एकेरी उल्लेख.
भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात चांगलाच गदारोळ केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवारदेखील आक्रमक झाले होते. त्यांनी भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्ड तपासले जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर अजित पवार म्हणाले की, "असे पायंडे पडणार असतील, तर आमच्या बाजूनेदेखील वरीष्ठ नेत्यांबाबत वेगळ्या प्रकारची वाक्यरचना करण्यात येऊ शकते. आमच्याकडूही माफी मागितली जाणार नाही." यावेळी अजित पवार यांनी अध्यक्षांना हात जोडून विनंती केली.
"आम्ही जसा वरिष्ठांचा आदर करतो तसा त्यांनी देखील आमच्या नेत्यांचा आदर करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे सभागृहात शरद पवार यांचा एकेरी उल्लेख योग्य नाही, या प्रकरणी कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली. यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी माफी मागत, 'शरद पवारांचा एकेरी उल्लेख आम्हाला मान्य नाही,' असे म्हणाले आणि त्यांनी राम सातपुतेंनाही माफी मागण्यास विनंती केली. यानंतर राम सातपुते यांनी माफी मागितली.