
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जमाईनच्या स्थगितीला नकार दिल्यानंतर आता त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. आज ते तुरुंगातून बाहेर येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. तसेच, पक्षाचे ३ मोठे नेते त्यांच्या स्वागतासाठी आज मुंबईत दाखल होणार आहेत. कारण, त्यांना मुंबईला घराव्यतिरिक्त इतरत्र राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्या वरळी येथील घराबाहेर त्यांच्या स्वागताचे मोठे पोस्टर लावण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे तिघेही अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी मुंबईत हजर राहणार आहेत. तसेच, त्यांच्या स्वागतासाठी बाईक रॅलीही काढण्यात येणार असून स्वतः खासदार सुप्रिया सुळे यामध्ये उपस्थित राहणार आहेत. तब्बल १४ महिन्यांच्या तुरुंगवासानंतर अखेर अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यामुळे राज्यभरात, खासकरून नागपुरात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जागोजागी पोस्टर्स लावून राष्ट्रवादीने त्यांच्या सुटकेसाठी त्यांना अभिनंदन केले आहे.