अजित पवारांच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले, "ही चर्चा तुमच्या मनात..."

सध्या अजित पवार यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चांवर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सोडले मौन
अजित पवारांच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले, "ही चर्चा तुमच्या मनात..."

गेले काही दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशामध्ये त्यांच्या हालचालींकडे प्रसार माध्यमांचे लक्ष असून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडलेल्या घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यावर प्रतिक्रिया अली असून त्यांनी याबाबत आपले मौन सोडले आहे. ते म्हणाले, "या सगळ्या चर्चा तुमच्या मनात असून राष्ट्रवादीच्या मनात असे काही नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, " सध्या या चर्चा सर्व तुमच्या मनात आहेत, राष्ट्रवादीच्या कोणाच्याही मनात असे काही नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नसून कोणीतरी बातम्या तयार करण्याचे काम करत आहे. त्याला काहीही अर्थ नाही," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करू शकतो? याचाच विचार करत आहेत. याशिवाय दुसरा कोणताही विचार कोणाच्या मनात नाही," असे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, "मी असे वाचले की राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक वगैरे आहे. ही बातमी १०० टक्के खोटी असून अशी कोणतीही बैठक नाही. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिटी निवडणुकीच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. मी या सगळ्या गोष्टींवर आता स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यामध्ये कोणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही," असे त्यांनी खडसावले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in