Sharad Pawar : 'या' कारणामुळे कसब्यात झाला भाजपचा पराभव; काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी घेतली भेट
Sharad Pawar : 'या' कारणामुळे कसब्यात झाला भाजपचा पराभव; काय म्हणाले शरद पवार?

आज कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भाजपचा कसबा पेठमधील पराभव हा खासदार गिरीश बापट आणि टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे झाला." तसेच, ते म्हणाले की, "या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी कामे केली. हा महाविकास आघाडीचा विजय असून आगामी काळातसुद्धा तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहोत," असेदेखील स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, "माझा प्रयत्न राहणार आहे की, विधानसभा आणि लोकसभेसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहतील. लोकांनादेखील बदल हवा आहे. लोकांची इच्छा आहे की आम्हीं एकत्रित राहावे," असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, "या पोटनिवडणुकीत महविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी कामे केली. आमचा उमेदवार सगळ्यांना मान्य होता म्हणून तो निवडून आला. कसबा पेठ हा भाजपचा गड मानला जात होता. खासदार गिरीश बापट यांनी तिथे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांची गोष्ट वेगळी होती, कारण त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. म्हणूनच हा मतदारसंघ जड जाणार, असे काही लोकांची मते होती. पण गिरीश बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतले गेले त्याचा फटका भाजपला बसला," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले आमदार रवींद्र धंगेकरांचे कौतुक

"रवींद्र धंगेकर हा उमेदवार गाड्यांमध्ये फिरणारा नाही तर हा उमेदवार दुचाकीवर फिरणारा आहे. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. म्हणून दोन पायांचे लोक याला मतदान करतील, याची खात्री होती. रवींद्र धंगेकरांना यश मिळेल असे लोकांकडून ऐकायला मिळत होते." असे म्हणत त्यांनी रवींद्र धंगेकरांचे कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in