महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह; शरद पवार यांच्या विधानाने राजकारण ढवळले

एकीकडे मविआच्या वज्रमूठ सभांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यभर रान पेटवत असतानाच पवार त्यावर पाणी टाकण्याचे काम करत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसमध्ये उमटली
महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह; शरद पवार यांच्या विधानाने राजकारण ढवळले

‘‘२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, हे आताच कसे सांगणार? एकत्र लढण्याची इच्छा आहे, पण फक्त इच्छा पुरेशी नसते,’’ असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यभर रान पेटवत असतानाच पवार त्यावर पाणी टाकण्याचे काम करत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसमध्ये उमटली आहे. पवारांच्या मनात नेमके काय आहे, असा सवाल विचारला जात आहे.

गौतम अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादीने भाजपला पूरक भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली होती. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनीही मोदींचे गुणगान गायल्यामुळे राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जात असल्याचे अनुमान काढण्यात आले. त्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी स्पष्टीकरण देत हा विषय निकाली काढला होता. मात्र, अमरावती येथे बोलताना महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनीच आघाडीच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली. ‘‘आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा पुरेशी नसते, त्यामध्ये जागांचे वाटप अजून काहीच केले नाही. त्यामुळे त्याबाबत कसे सांगता येईल,’’ असे शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “भाजपच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकदिलाने लढावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. आमच्याशी आघाडी करणाऱ्यांची काही वेगळी मते असू शकतात. पण, संविधान धोक्यात आहे आणि जो आमच्यासोबत राहील, त्याला सोबत घेऊनच चालणार, यावर आमचा ठाम विश्वास आहे,’’ असे पटोले म्हणाले.

‘‘महाविकास आघाडीविषयीचे पवारांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असू शकत नाही. आघाडी किती पुढे जाईल, याविषयी जनतेतच नव्हे आघाडीच्या नेत्यांमध्येही संभ्रम आहे,’’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘शरद पवार मोजून मापून बोलतात. अनेक पक्षांच्या आघाडी होतात आणि त्यात बिघाडी देखील होत असतात. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईलच, असे नाही. शरद पवार महाविकास आघाडी तुटणार, असे म्हणाले नाहीत. कुठल्याही आघाडीमध्ये काही अडचणी येत असतात. त्या अर्थाने ते बोलले, आज तरी आघाडी आहे. त्यामुळे याचा अर्थ असे नाही की ताबडतोब आघाडीमध्ये बिघाडी होईल,’’ असे भुजबळ म्हणाले.

संजय राऊत यांच्याकडून सारवासारव

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांच्या मनात तसे काहीही नाही, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचा दावा राऊत यांनी केला. ‘‘याक्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. आमच्या मोठ्या सभा होत आहेत. १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होणार आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचाही वाटा आहे. शरद पवारांची पहिल्यापासून एकत्र निवडणुका लढण्याची इच्छा आहे. २०२४ साली आपण भाजपचा पराभव करू, ही पवारसाहेबांची भूमिका आहे,’’ असे राऊत म्हणाले.

शरद पवार यांचे विधानावर दिले स्पष्टीकरण

‘‘माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडी कायम राहावी, यासाठी माझा प्रयत्न आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नये,’’ असे शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in