गेल्या चार महिन्यांत मुंबईत किती घरांची झाली विक्री?

मुंबईत घरांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे मुंबई महानगरपालिका हद्दीत घरांची मागणी वाढली आहे.
 (संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये घर खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यात मुंबईत तब्बल ४८ हजार ८१९ घरांची विक्री झाली आहे. तर एप्रिल महिन्यात ११ हजार ६४८घर विक्रीची नोंद नोंदणी व मुद्रांक विभागाकडे झाली आहे. गत वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या एप्रिलमध्ये मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईत घरांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे मुंबई महानगरपालिका हद्दीत घरांची मागणी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सरकारने धोरणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामुळे घर खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. घर खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने यंदा मुद्रांक शुल्क न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदीला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.

जानेवारी महिन्यात मुंबईत ११ हजार ६४८ घरांची विक्री झाली होती, तर फेब्रुवारी महिन्यात १२ हजार ०५५, मार्च महिन्यात १४ हजार १४९ आणि एप्रिल महिन्यात ११ हजार ६४८ घरांच्या विक्रीची अशी एकूण ४८ हजार ८१९ घरांची मुंबईत विक्री झाल्याची नोंद नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे झाली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात १० हजार ५१३ घरांची विक्री झाली होती. तर गेल्या एप्रिल महिन्यात११ हजार ६४८घर विक्रीची नोंद झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in