मंदीच्या भीतीने जागतिक बाजारात नकारात्मक संकेत;सेन्सेक्स ६३८ अंकांनी गडगडला

अदानी पोर्ट्स, टाटा कंझ्युमर, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, हिंदाल्को हे निफ्टी-५०चे सर्वाधिक नुकसान झाले.
मंदीच्या भीतीने जागतिक बाजारात नकारात्मक संकेत;सेन्सेक्स ६३८ अंकांनी गडगडला

मंदीच्या भीतीने जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात व्यवहाराच्या पहिल्या दिवशी - सोमवारी घसरण झाली. सेन्सेक्स ६३८.११ अंकांनी घसरून ५६,७८८.८१वर बंद झाला. निफ्टी २०७ अंकांनी घसरून १६,८८७.३५ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २७ समभाग घसरले. त्याच वेळी केवळ ३ समभागांमध्ये वाढ दिसून आली. दरम्यान, भारतीय चलन बाजारात रुपयाची घसरण सुरुच आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४९ पैशांनी घसरुन ८१.८९ झाला.

अदानी एंटरप्रायझेस, आयशर मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा कंझ्युमर, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, हिंदाल्को हे निफ्टी-५०चे सर्वाधिक नुकसान झाले. तर ओएनजीसी, डॉ. रेड्डीज, सिप्ला, बीपीसीएल, कोल इंडिया, एनटीपीसी, डिव्हिस लॅब आणि भारती एअरटेल हे आघाडीवर होते.

दुसरीकडे सुरुवातीच्या व्यापारात नायकाचे शेअर्स ११ टक्के वाढले होते. तथापि, हा समभाग २.५५ टक्के वाढून १३०४.५५वर बंद झाला. बोनस शेअरची घोषणा झाल्यानंतर नायकाच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. कंपनीच्या बोर्डाने ५:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचा एक शेअर असेल तर त्याला ५ बोनस शेअर्स दिले जातील. कंपनीने यासाठी ३ नोव्हेंबर २०२२ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

त्याचवेळी एनएसईच्या ११ पैकी १० क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. फक्त फार्मा सेक्टरमध्ये सुमारे १ टक्का वाढ झाली. ऑटो, एफएमसीजी आणि पीएसयू बँक क्षेत्रात २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. याशिवाय बँका, खासगी बँका, वित्तीय सेवा, धातू, मीडिया, रियल्टी आणि आयटी क्षेत्रांतही घसरण झाली.

शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सलग सात दिवसांच्या घसरणीनंतर बाजार घाईघाईने बंद झाला. सेन्सेक्स १०१६ अंकांच्या वाढीसह ५७,४२६ वर बंद झाला. निफ्टी २७६ अंकांनी वाढून १७,०९४ वर बंद झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in