मुंबई : गाडी उतार रस्त्यावर पार्क करताना गाडीचा हँडबेक्र लावण्याची खबरदारी घेणे महत्त्वाची आहे. अन्यथा गाडी उतारावरून मागे येऊन उपघात झाल्यास तो निष्काळजीपणाचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा गिरगाव दंडाधिकारी नदीम पटेल यांनी देताना टँकरचालक सकलदेव साह याला दोषी ठरवले; मात्र दंडाधिकारी न्यायालयाने चांगल्या वर्तनाच्या हमीवर १० हजार रुपयांच्या बॉण्डवर सुटका केली.
दोन वर्षांपूर्वी २९ जानेवारी २०२२ रोजी मलबार हिल वाळकेश्वर रोडवर उतारवर टॅकर उभा होता. त्याच्या दरम्यान कारमालक तक्रारदार कारमालक आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आला. मुलाला वर्गात सोडल्यानंतर त्याने गोपी बिर्ला शाळेसमोर कार उभी केली. त्यावेळी उतारावर उभा असलेला टँकर आपोआप मागे आला आणि त्याची कारला धडक बसली. या अपघातात कारमालक जखमी झाला आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी कारमालकाने पोलीस तक्रार केली. मलबार हिल पोलिसांनी त्याआधारे टँकरचालक सकलदेव साह विरोधात गुन्हा नोंदवून खटला दाखल केला.
या खटल्याची दंडाधिकारी नदीम पटेल यांच्यासमोर सुनावणी झाली. दंडाधिकारी पटेल यांनी टँकरचालकाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले. गाडी उतारावर उभी केल्यानंतर वाहनचालकाने हँडब्रेक लावून पुरेशी काळजी घेणे आवश्यकच आहे. त्यामुळे गाडी जागेवरून हलू शकत नाही. चालकाने हँडब्रेक लावल्याचा दावा केला असला, तरी गाडी जागेवरून मागे आलेली आहे. यावर हेच स्पष्ट होते की, गाडीचा हँड ब्रेक लावण्यात आला नव्हता. असे निरिक्षण नोंदविताना दंडाधिकाऱ्यांनी उतारावर गाडी उभी करताना पुरेशी काळजी न घेणे आणि हँडब्रेक न लावणे हे निष्काळजीपणाचेच कृत्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत टँकरचालक साह याला निष्काळजीपणाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले; मात्र सहाच्या हातातून पहिल्यांचा अशा प्रकारचा गुन्हा झाल्याने चांगल्या वर्तनाची लेखी हमी घेत १० हजार रुपयांच्या बॉण्डवर सुटका केली.