Nepal Floods : मुंबईतील आठ पर्यटकांचा ठावठिकाणा लागेना; महाराष्ट्रातील ४०४ जण सुरक्षित

नेपाळमध्ये आलेल्या महापुराला चार दिवस उलटूनही मुंबईतील आठ पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ४०४ नागरिक सुरक्षित असून ३३८ जणांशी संपर्क झाला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
नेपाळमधील महासंकटातून वाचलेले पर्यटक शनिवारपासून मुंबईत येण्यास सुरुवात झाली.
नेपाळमधील महासंकटातून वाचलेले पर्यटक शनिवारपासून मुंबईत येण्यास सुरुवात झाली. छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : नेपाळवर महाभीषण जलप्रलयाचे संकट कोसळून चार दिवस उलटल्यानंतरही मुंबईतील आठ पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबीयांची आणि मित्रपरिवाराची चिंता वाढली आहे. संपर्क होऊ न होऊ शकलेले पर्यटक हे अंधेरी आणि बोरिवलीतील आहेत, तर सध्या नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ४०४ नागरिक सुरक्षित असून यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन विभागाने शनिवारी केला.

बोरीवली आणि अंधेरी येथील आठ पर्यटक आपत्तीमुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. यापैकी अंधेरी येथील लक्ष्मीनारायण आचार्य यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांचा अथवा ग्रुप मधील इतरांचा मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने सद्यस्थितीत अडचणी येत आहेत. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रातील ४५ पर्यटकांचा भारतीय हद्दीत सुरक्षित प्रवेश

राज्यातील ४५ जणांच्या पर्यटक गटाने आज भारतीय हद्दीत प्रवेश केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक, पुणे, मुंबई आणि अहिल्यानगर येथील नागरिक नेपाळला गेले होते. महापुराच्या घटनेच्या कालावधीत हे नागरिक चितवन येथे होते. काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्याने त्यांना लुंबिनी मार्गे त्यांना आणण्यात येत आहे. हे पर्यटक अयोध्या येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन केले जाणार आहे.

दरम्यान, नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत. तसेच ३७ नागरिक सागा, मानसरोवरजवळ येथून भारताच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

छायाचित्र : विजय गोहिल

आणखी १४९ नागरिकांची यादी

परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट प्रदेशात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी राज्याला प्राप्त झाली आहे. या यादीतील नागरिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील असल्याने संबंधित जिल्ह्यांच्या माध्यमातून त्यांची माहिती घेण्याचे आणि पडताळणीचे काम वेगाने सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारने मदत कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी ९३२१५८७१४३, ८६५७११२३३३, ९१६७११२११३, १०७० आणि ०२२-२२०२७९९० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांची माहिती पडताळण्याचे काम सुरू असून प्रवासी संस्था आणि कुटुंबीयांशी हेल्पलाइनद्वारे सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

चार भाविक काठमांडूत

कैलास मानसरोवर यात्रेनंतर परतत असताना केरुंग (ग्यिरोंग) येथे अडकलेले महाराष्ट्रातील स्मिता प्रदीप पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले आणि पूजा भोसले हे चारही भाविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे आज काठमांडूहून विमानाने मुंबईत पोहचले..

छायाचित्र : विजय गोहिल

'आम्हाला देवाने वाचवले'

'आम्ही सुरक्षितपणे परत आलो याचा आम्हाला आनंद आहे. देवानेच आम्हाला वाचवले आहे असे वाटते. देवाचे सर्व आशीर्वाद आमच्या पाठीशी होते, म्हणूनच आम्ही आमची कैलास पर्वत यात्रा सुरक्षितपणे पूर्ण करू शकलो,' अशा शब्दांत नेपाळमधून शनिवारी मुंबईत परतलेल्या महाराष्ट्रातील ३७ पर्यटकांनी आपल्या भावभावना व्यक्त केल्या.

नेपाळमधील महापुरात मृतांचा आकडा ६६९

नेपाळमध्ये महापुरातील मृतांचा आकडा शनिवारी ६६९ वर पोहोचला. दरम्यान, बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध आणि मदतकार्य सुरू असून, जवळपास २,५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, २,४०० हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा पुराची लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बचाव पथकांनी सावधगिरी बाळगत शोधमोहीम आणि मदतकार्य सुरूच ठेवले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in