Nepal Floods : अडकलेल्यांमध्ये मुंबईचे दोन नामांकित डॉक्टर

नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत मुंबई, नागपूरसह राज्यातील ११० पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी दिली. अडकलेल्या पर्यटकांमध्ये विविध टूर कंपन्यांमार्फत नेपाळमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचा तसेच मुंबईतील दोन प्रतिथयश डॉक्टरांचा समावेश आहे.
Nepal Floods : अडकलेल्यांमध्ये मुंबईचे दोन नामांकित डॉक्टर
Nepal Floods : अडकलेल्यांमध्ये मुंबईचे दोन नामांकित डॉक्टर
Published on

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत मुंबई, नागपूरसह राज्यातील ११० पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी दिली. अडकलेल्या पर्यटकांमध्ये विविध टूर कंपन्यांमार्फत नेपाळमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचा तसेच मुंबईतील दोन प्रतिथयश डॉक्टरांचा समावेश आहे.

मुंबईच्या अंधेरीतील डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. गायत्री देशपांडे नेपाळमध्ये अडकले आहेत. डॉ. आनंद देशपांडे हे हिंदुजा रुग्णालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागाचे सल्लागार आणि प्रमुख आहेत.  तर डॉ. गायत्री देशपांडे या नानावटी रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख तसेच  वरिष्ठ सल्लागार आहेत.  मुंबईतील 'हिल्स अँड ट्रेल्स' या टूर कंपनीमार्फत ते नेपाळला पर्यटनासाठी गेले आहेत.

यासंदर्भात  देशपांडे यांची भाची मैथिली मुंडलेने माहिती दिली की,  बुधवारी सकाळी ८.२८ वाजता कुटुंबियांचे त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर नातेवाइकांनी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यांना व्हॉटस्अप संदेश पाठवल्यानंतर केवळ एकच टिक दिसत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला,  मात्र त्याच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील 'हिल्स अँड ट्रेल्स' तसेच 'रिचा टूर्स प्रा. लि.' या पर्यटन कंपन्यांमार्फत नेपाळला गेलेल्या पर्यटकांशी बुधवार  सकाळनंतर संपर्क झालेला नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारशी आणि केंद्र सरकारने नेपाळ सरकारशी याबाबत संपर्क केल्यानंतर नेपाळ सरकारचे पथक हे पर्यटक जिथे गेले होते, तिकडे शोध घेण्यासाठी  रवाना झाले आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती नेपाळमध्ये अडकल्या असल्यास त्यांची माहिती ९३२१५८७१४३, १०७० आणि ०२२-२२०२७९९० या हेल्पलाईन क्रमांकांवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच controlroom@maharashtra. gov.in या ई-मेलवरही माहिती देता येणार आहे.

नेपाळमधील महापुरात जे  महाराष्ट्रातील जे लोक तिथे अडकले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन त्यासाठी कार्यरत आहेत. काही जण तिबेटमध्येही गेले होते, त्यांच्याशी संपर्क झाला आहे. मानसरोवर यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंना नेपाळमधून येणाऱ्या मार्गावर अडचण निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या सर्व संबंधित विभागांशी आपण संपर्कात आहोत. राज्य सरकार ॲलर्ट मोडवर आहे.  

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

logo
marathi.freepressjournal.in