

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका महिलेचा पर्दाफाश केला आहे. शांती अर्जुनसिंग थापा नावाची ही महिला प्रत्यक्षात नेपाळची नागरिक असून ती गेली ३० वर्षे कल्याणमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे परदेशी नागरिक असूनही तिच्याकडे भारतीय मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळाले असून तिने महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये अनेकदा मतदानही केल्याचा खुलासा झाला आहे.
समाधानकारक उत्तर न दिल्याने अधिकाऱ्यांना आला संशय
एफआयआरनुसार, ही महिला २४ ऑक्टोबर रोजी नेपाळमधील काठमांडूहून मुंबई विमानतळावर आरए-२०१ या विमानाने आली होती. नियमित इमिग्रेशन तपासणीदरम्यान तिने भारतीय मतदार ओळखपत्र (HTQ०८९०४२६) आणि बोर्डिंग पास सादर केला. तिच्याकडून प्रवासाचे उद्दिष्ट आणि राष्ट्रीयत्वाबाबत विचारले असता ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. तिच्या नावातील विसंगती आणि उत्तरांमुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि पुढील चौकशीसाठी तिला इमिग्रेशन विभागाच्या विंग इन्चार्जकडे सोपवण्यात आले.
चौकशीत उघड झाले की ही महिला प्रत्यक्षात नेपाळची नागरिक असून तिचे खरे नाव चंदा रेग्मी आहे. तिचा जन्म २५ नोव्हेंबर १९७६ रोजी नेपाळची राजधानी काठमांडू जिल्ह्यातील फुतुंग येथे झाला होता. ती गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहत आहे. तपासानुसार, चंदा १९९६ साली आपला पती अर्जुनसिंग थापा याच्यासह भारतात आली आणि ठाण्यातील डोंबिवली (पूर्व) येथील सागावजवळील बुद्ध विहार परिसरातील जय कमल रेसिडेन्सी येथे राहत होती. या दरम्यान तिने निवडणूक आयोगाला खोटी माहिती देऊन मतदार ओळखपत्र, आधार आणि पॅनकार्डसह भारतीय ओळखपत्रे फसवणुकीने मिळवली. तिने या खोट्या भारतीय मतदार ओळखपत्राचा वापर करून भारत आणि नेपाळदरम्यान अनेक वेळा प्रवास केला होता, ज्यामध्ये २४ ऑक्टोबरचा अलीकडील प्रवासही समाविष्ट आहे. चौकशीदरम्यान तिने आपल्या नावावर असलेले नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्रही सादर केले, ज्यामुळे तिचे नेपाळी नागरिकत्व निश्चित झाले.
मतदार यादींच्या प्रामाणिकतेबाबत गंभीर प्रश्न
दुहेरी ओळख आणि फसवे कागदपत्रे सिद्ध झाल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला पुढील तपासासाठी सहार पोलिसांकडे सोपवले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे काही परदेशी नागरिक फसवणुकीने भारतीय मतदार म्हणून नोंदणी करत असल्याचे आणि सरकारी ओळखपत्रे मिळवत असल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे मतदार यादींच्या प्रामाणिकतेबाबत आणि दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सहार पोलिस या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेत तपास करत आहेत. शांती उर्फ चंदा (वय ४९) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२) आणि ३१८(४) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि सरकारी कागदपत्रांसाठी खोटी माहिती देणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इमिग्रेशन विभागाने जप्त केली कागदपत्रे :
भारतीय मतदार ओळखपत्र (HTQ०८९०४२६) – नाव : शांती अर्जुनसिंग थापा,
बोर्डिंग पास – फ्लाईट आरए-२०१ (काठमांडू–मुंबई),
नेपाळ नागरिकत्व प्रमाणपत्र (क्र. ९७७८) – नाव : चांदा रेज्मी,
भारतीय आधार कार्ड (७१४४३८८४४३७७),
भारतीय पॅन कार्ड (AWEPT८०६६H),
