बोगस वर्क परमीटवर कुवेतला जाणाऱ्या नेपाळी महिलांना अटक

याप्रकरणी बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली.
बोगस वर्क परमीटवर कुवेतला जाणाऱ्या नेपाळी महिलांना अटक

मुंबई : बोगस वर्क परमीटवर कुवेतला नोकरीसाठी जाणाऱ्या दोन नेपाळी महिलांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अटक केली. या दोघांनाही पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. माईली माया भोमजन आणि भगवती डांगी अशी या दोघींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी २२ डिसेंबरला माईली आणि भगवती या दोन महिला कुवेतला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्याकडील नेपाळी पासपोर्ट, बोर्डिंग पास, व्हिसा पेपर आणि परमीट कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्या दोघीही कुवेत नोकरीसाठी जात असल्याचे उघडकीस आले; मात्र त्यांनी सादर केलेले वर्क परमीट बोगस असल्याचे उघडकीस आले. चौकशीअंती त्यांना एका एजंटने ते परमीट प्रत्येकी दहा हजारामध्ये दिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघींना पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी बोगस दस्तावेज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in