

मुंबई : मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान नेपियन सी मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्यात ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' प्राप्त झाले आहे. १७फेब्रुवारीपासून या कामास सुरुवात होणार असून पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रीटीकरण कामे सुरु आहेत. काँक्रीटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत.
एकूण मिळून ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. तर पुढील कालावधीत काँक्रीटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. हाती घेतलेला रस्ता निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
...असे होणार काँक्रीटीकरण
काँक्रीटीकरण टप्पा १ अंतर्गत शहर विभागातील नेपियन सी रस्ता या महत्त्वपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण हाती घेण्यात आले आहे. उपप्रमुख अभियंता (रस्ते) शहर कार्यालयाने या कामी सूक्ष्म नियोजन केले आहे. या रस्त्याची एकूण लांबी १९५० मीटर आहे. त्यात पुलाचा २०० मीटर भाग समाविष्ट आहे. त्यापैकी १,७५० मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण नियोजित आहे. पहिल्या टप्प्यात मुकेश चौक ते प्रियदर्शिनी पार्क दरम्यान ७७० मीटर लांब व २७.४५ मीटर रुंद रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. डी विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी अलीकडेच या रस्ते कामाचा आढावा घेतला. स्थानिक नगरसेवक अजय पाटील, सनी सानप, स्नेहल तेंडुलकर, गौरंग झवेरी यांच्यासह उपप्रमुख अभियंता (रस्ते) (शहर) डॉ. विशाल ठोंबरे, सहाय्यक अभियंता हुलावळे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.