नेरळला आयजीबीसीचे 'गोल्ड रेटिंग'; सौरऊर्जा, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक सुविधांची दखल

मध्य रेल्वेवरील नेरळ रेल्वे स्थानकाने पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नेरळ स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून (आयजीबीसी) प्रतिष्ठित ‘गोल्ड रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे.
नेरळला आयजीबीसीचे 'गोल्ड रेटिंग'; सौरऊर्जा, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक सुविधांची दखल
नेरळला आयजीबीसीचे 'गोल्ड रेटिंग'; सौरऊर्जा, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक सुविधांची दखल
Published on: 

मुंबई : मध्य रेल्वेवरील नेरळ रेल्वे स्थानकाने पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नेरळ स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून (आयजीबीसी) प्रतिष्ठित ‘गोल्ड रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. या महिन्यात झालेल्या अंतिम मूल्यांकनानंतर हे मानांकन जाहीर करण्यात आले.

स्थानकाच्या आधुनिकीकरणासोबतच पर्यावरण संवर्धन, ऊर्जाबचत आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची या मानांकनाद्वारे दखल घेण्यात आली आहे. स्थानकाच्या छतावर ३७५ किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच विजेचा वापर कमी करण्यासाठी एलईडी दिवे, बीएलडीसी पंखे आणि स्टार रेटिंग असलेल्या विद्युत उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.

नैसर्गिक प्रकाश, हवा खेळती राहण्यासाठी विशेष व्यवस्था

प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात चार सरकते जिने, पाच लिफ्ट आणि ४३७ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, स्पर्शज्ञान मार्गिका, सुलभ स्वच्छतागृहे आणि दिशादर्शक फलकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्थानक परिसरातील अस्तित्वातील झाडांचे जतन, हरित क्षेत्राची निर्मिती आणि उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही उभारण्यात आली आहे.

हे आहेत निकष

आयजीबीसीने स्थानकाचे सहा प्रमुख निकषांवर मूल्यांकन केले. त्यामध्ये शाश्वत स्थानक सुविधा, आरोग्य व स्वच्छता, ऊर्जा कार्यक्षमता, जलकार्यक्षमता, स्मार्ट व हरित उपक्रम तसेच नावीन्यपूर्ण विकासाचा समावेश होता. एमआरव्हीसीचे अधिकारी विलास वाडेकर यांनी या मानांकनाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रवाशांच्या सोयीसुविधांसोबत पर्यावरणीय शाश्वततेचा समतोल राखत मुंबईतील उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या एमआरव्हीसीच्या प्रयत्नांना या गौरवामुळे बळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी अनुकूल रेल्वे स्थानके विकसित करण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)