Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

दीर्घकाळापासून रखडलेल्या नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सेवेमुळे सध्या ९० मिनिटांचा रोड प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सुरुवातीला दररोज चार ट्रिप्स आणि २०...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

दीर्घकाळापासून रखडलेल्या नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हिंदूस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या सेवेमुळे सध्या ९० मिनिटांचा रोड प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सिडकोने उभारलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनल (NPWT) साठी ही सेवा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, कारण उद्घाटनापासून हे टर्मिनल जवळपास निष्क्रियच आहे.

दिवसातून ४ ट्रिप, प्रति प्रवासी भाडे ₹९३५

हिंदुस्थान टाईम्सच्या माहितीनुसार, सुरुवातीला दररोज चार ट्रिप्स आणि २० आसनी फेरी या मार्गावर धावेल. प्रति प्रवासी ₹९३५ इतके भाडे आकारले जाईल. मेरीटाईम बोर्डाकडून अंतिम परवानगी मिळताच सेवा अधिकृतरीत्या सुरू केली जाईल. ही मंजुरी वेळेवर मिळण्याची अपेक्षा असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरक्षा कडक; पर्यटकांसाठी नवे आकर्षण

फेरीचे ऑपरेटर ‘वॉटरफ्रंट एक्सपिरीयन्सेस मुंबई प्रा. लि.’ (द्रीष्टी ग्रुप) यांनी नेरुळ–मुंबई मार्गासाठी सुरक्षा अधिक कडक केली आहे. तसेच, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑपरेटरकडून विविध योजना तयार केल्या जात आहेत.

  • सर्व प्रवाशांनी चढताना लाईफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक

  • जानेवारीपासून स्पीडबोट शो

  • लवकरच जेट-स्कीइंग

  • फ्लोटिंग रेस्टॉरंट

  • फ्लेमिंगो टुरिझम सर्किट

  • वॉटरस्पोर्ट्स, स्पीडबोट शो, जेट-स्की यांसारखे उपक्रम जानेवारीपासून

  • मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांना नेरुळ जेटीवर ओरिएंटेशन देऊन डीपीएस लेक परिसरात फ्लेमिंगो निरीक्षणासाठीही नेले जाईल.

सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले, “विमानतळ, मेट्रो आणि नवीन रस्ते यांच्यासोबत आता जलवाहतूकही महत्त्वाचा वाहतूक दुवा ठरणार आहे. हा मार्ग प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि संपूर्ण नेटवर्क अधिक गतिमान करेल.” सिंघल यांनी सांगितले की नेरुळ टर्मिनल आता योजनेप्रमाणे बहुमार्गीय समुद्री केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. “एलिफंटा सेवा आधीपासूनच सुरू आहे, भाऊचा धक्का लिंक तयार आहे आणि पर्यटकांसाठी नवे उपक्रमही सुरू आहेत,” असे ते म्हणाले.

१५० कोटींचा टर्मिनल… पण वर्षानुवर्षे निष्क्रिय

सुमारे ₹१५० कोटी खर्चून उभारलेला नेरुळ टर्मिनल २०२३ मध्ये उद्घाटन झाले तरी पाण्याची अपुरी खोली, परवानग्यांतील विलंब आणि टेंडर प्रक्रियेमुळे जवळपास तीन वर्षे निष्क्रिय राहिला. यंदा सुरू झालेल्या नेरुळ–एलिफंटा सेवेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. “गेल्या महिन्यात फक्त ६० प्रवासी या मार्गावर प्रवासाला आले,” असे ऑपरेटरने सांगितले. ऑपरेटरच्या मते, नियमित सेवा, नियोजित वेळापत्रक आणि जागरूकता वाढली की प्रवासी संख्या सुधारेल.

Ro–Ro प्रकल्प रद्द - कारण पाण्याची ‘खोली’ अपुरी

नेरुळहून Ro–Ro सेवा सुरू करण्याची दीर्घकाळापासूनची योजना आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

  • नेरुळ जेटीवर पाण्याची खोली फक्त १ ते १.५ मीटर

  • Ro–Ro जहाजांना किमान ४ मीटर खोली आवश्यक

  • भरतीची वेळही प्रवाशांच्या वेळेनुसार जुळत नाही.

डिझाईनमधील मर्यादा आणि ड्राफ्ट समस्यांमुळेच पूर्वीचे अनेक टेंडर अपयशी झाले होते, असे ऑपरेटरने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in