
मुंबई : सक्षमीकरण, स्वावलंबी बनवण्यासाठी महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्याचप्रमाणे स्वतःच्या सुरक्षेसाठी कुणावरही अवलंबून न राहता स्वसंरक्षण करता यावे, यासाठी प्रत्येक मुली, महिलांनी आठवड्यात एक दिवस तरी ज्यूडो किंवा कराटेचे प्रशिक्षण घ्यावे, याबाबत महिला गोविंदा गुरुवारी मुंबईत दहीहंडीच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. ‘पुन्हा निर्भया होणे नाही,’ हा यामागचा उद्देश असल्याचे आधारिका फाऊंडेशनचे संचालक विनायक मोरे यांनी सांगितले.
जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आधारिका फाउंडेशन ‘निर्भया महिला दहीहंडी’ पथकाच्या माध्यमातून मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. जेणेकरून ते संकटाच्या वेळी स्वतःचे रक्षण करू शकतील, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
जीवन प्रबोधिनी ट्रस्टसोबत आधारिका फाउंडेशनने दहीहंडीच्या दिवशी स्वसंरक्षण तंत्र प्रदर्शित करून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या महिला गोविंदा पथकात सर्व सहभागी मुली ८ ते १९ वयोगटातील असून मार्शल आर्ट्समध्ये प्रशिक्षित आहेत. कालीमातेची वेशभूषा करून मर्दानी चित्रपटातील गाण्यावर मार्शल आर्ट्स सादर करणार असून धर्मवीर चित्रपटातील आई जगदंबे गाण्यावर नृत्य करणार आहेत. दहीहंडीत या मुली त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी ४ ते ५ थरांचा पिरॅमिड तयार करणार आहेत.