‘न्यू एज अभ्यासक्रमा’साठी आयटीआयची विशेष फेरी; चौथ्या फेरीत १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

राज्यातील औद्यौगिक प्रशिक्षण संस्थांमधील १२ पारंपारिक अभ्यासक्रमाच्या २५ तुकडया बंद करून त्याऐवजी ७ न्यू एज व्यवसायाच्या २५ तुकडया सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
‘न्यू एज अभ्यासक्रमा’साठी आयटीआयची विशेष फेरी; चौथ्या फेरीत १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
Published on

मुंबई : राज्यातील औद्यौगिक प्रशिक्षण संस्थांमधील १२ पारंपारिक अभ्यासक्रमाच्या २५ तुकडया बंद करून त्याऐवजी ७ न्यू एज व्यवसायाच्या २५ तुकडया सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमांसाठी विशेष फेरीमध्ये प्रवेशाची संधी देण्यात आली आहे.

पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जगभरात वाढणारी जागरूकता, केंद्र आणि राज्य सरकारच्या हरित ऊर्जा धोरणांमुळे मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल आणि सोलर टेक्निशन (इलेक्ट्रिक) या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यासाठी ७ न्यू एज अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी आयटीआयकडून विशेष प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही विशेष फेरी ६ ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे.

विशेष फेरीचे वेळापत्रक

विशेष फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करण्यासाठी ६ ते १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता निवड यादी जाहीर करण्यात येईल. निवड यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

हे असणार आहेत ७ न्यू एज अभ्यासक्रम

  • आर्टिफिशियल इंटिलिजिन्स

  • प्रोग्रामिंग असिस्टंट, इंडस्ट्रियल

  • रोबोटिक ॲंड डिजिटल

  • मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन,

  • थ्रीडी प्रिटिंग,

  • ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन टेक्निशयन,

  • टेक्निशयन मेकॅट्रॉनिक्स

या विषयांच्या तुकड्या केल्या बंद

कॉस्मेटोलॉजी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, मेकॅनिक मोटर व्हेईकल, फिटर, आयओटी टेक्निशयन, सर्वेक्षक, आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन, मेकॅनिक मायनिंग मशीनरी, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, गवंडी, शिलाई मशीन या अभ्यासक्रमाच्या तुकड्या बंद करण्यात आल्या.

चौथ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर

आयटीआय अभ्याक्रमाच्या चौथ्या फेरीसाठीची निवड यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये सरकारी आयटीआयमध्ये १४ हजार ८१२ तर खासगी आयटीआयमध्ये २ हजार ८६३ अशा १७ हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना ६ ते १० ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

logo
marathi.freepressjournal.in