

मनोज रामकृष्णन/मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ च्या निर्गमन कक्षाबाहेर काही व्यक्तींनी जाहीरपणे ‘मातम’ केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. शिया मुस्लिमांकडून मोहरम महिन्यानिमित्त करण्यात आलेल्या या शोकविधीवर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला असून सार्वजनिक जागेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बजरंग दलाने पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. विमानतळासारख्या संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गर्दी जमवून विधी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि इतर प्रवाशांना नाहक त्रास होतो, असे रावरिया यांनी तक्रारीत नमूद केले.
दरम्यान, शिया समुदायाच्या प्रतिनिधींनी मोहरमदरम्यान इराकमधील करबला यात्रेसाठी निघताना असे विधी केले जात असल्याचे सांगितले. मात्र, नाव न छापण्याच्या अटीवर एका सदस्याने विमानतळासारख्या ठिकाणी असे प्रदर्शन करणे अयोग्य असल्याचे मान्य केले.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
याप्रकरणी पोलिसांनी पुढील ४८ तासांत योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास विमानतळावरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या संपूर्ण घटनेवर अधिकृत भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.