शिवडी स्थानकाजवळ नवा उड्डाणपूल; नवी मुंबईहून थेट वरळीत जाता येणार

उड्डाणपुलावर स्टील गर्डर बसविण्यात येणार असून त्याचा फेब्रिकेशनच्याही कामांना सुरुवात करण्यात आली आहे
शिवडी स्थानकाजवळ नवा उड्डाणपूल;  नवी मुंबईहून थेट वरळीत जाता येणार
ANI
Published on

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (‘महारेल’) रेल्वेच्या हद्दीत शिवडी येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आवश्यक त्या प्राथमिक कामांना सुरुवात करण्यात आली असून उड्डाणपुलासाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून अंतिम मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या नवीन उड्डाणपुलामुळे भविष्यात नवी मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्यांना या उड्डाणपुलावरून शिवडीमार्गे वरळी जाणे शक्य होणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि शिवडी-वरळी उन्नत मार्गिकेचा महत्त्वाचा भाग म्हणून शिवडी स्थानकाजवळील नव्या पुलाकडे पाहिले जाते. ‘एमएमआरडीए’ने शिवडी उड्डाणपुलाचे काम नुकतेच ‘महारेल’ला सोपवले आहे. या उड्डाणपुलासाठी सद्यस्थितीत आवश्यक अशी किरकोळ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये केबल, पाइप अन्यत्र स्थलांतरित करणे, मातीचे ढिगारे, उत्खनन इत्यादी कामे सुरू करण्यात आल्याची माहिती महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याशिवाय उड्डाणपुलावर स्टील गर्डर बसविण्यात येणार असून त्याचा फेब्रिकेशनच्याही कामांना सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे हद्दीतील महत्त्वाच्या कामांसाठी मध्य रेल्वेची मंजुरी आवश्यक असून त्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या उड्डाणपुलासाठी ४५ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून मध्य रेल्वेच्या मंजुरीनंतर १५ महिन्यात बांधकाम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महारेलकडून देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in