

मुंबई : न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू बोहान याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बँकेचा माजी सीईओ बोहान याची गुरुवारी व शुक्रवारी पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली. यापूर्वी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता व विकासक धर्मेश पौन याला अटक करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या परीक्षणात बँकेच्या निधीचा अपहार झाल्याचे दिसून आल्यानंतर बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत.
बँकेचा माजी जीएम (महाव्यवस्थापक) हितेश मेहता हा आपल्या दोन कर्मचाऱ्यांना फोन करून बँकेच्या तिजोरीतून एकाच वेळी ५० लाख रुपये काढायला सांगायचा. हे पैसे तो मेहता यांच्या माणसांना देत होता. बँकेच्या तिजोरीपर्यंत मेहता याला पोहोचता यायचे. कारण तो बँकेचा संरक्षक होता. याप्रकरणी साक्षीदार बनलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अनेक लोकांना अनेकवेळा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे.
बँकेच्या माजी कर्मचाऱ्याने बँकेतील परिस्थितीची माहिती आरबीआयला पत्राद्वारे दिली. आता आरबीआयकडून या पत्राबाबत दुजोरा मिळवला जात आहे. बँकेची परिस्थिती खराब आहे. कारण चुकीच्या व्यक्तींना पैसे वितरीत होत असल्याने बुडित कर्ज वाढत आहे. याची कल्पना बँक अधिकाऱ्यांना होत होती, असे पोलिसांनी सांगितले.