न्यू इंडिया बँक घोटाळा : बिल्डरला अटक; मॅनेजरला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळ्याप्रकरणी बिल्डर धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली आहे, तर अटक केलेला बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याला कोर्टाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
न्यू इंडिया बँक घोटाळा : बिल्डरला अटक; मॅनेजरला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Published on

मुंबई : न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळ्याप्रकरणी बिल्डर धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली आहे, तर अटक केलेला बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याला कोर्टाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. महाव्यवस्थापक मेहतावर १२२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हितेश मेहता व बिल्डर धर्मेश पौन यांना रविवारी सुटीकालीन न्यायालयात उभे केले. न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या बँक घोटाळ्याप्रकरणी बिल्डर धर्मेश पौन (५८) याला रविवारी अटक केली. या घोटाळ्यात पौन याने ७० कोटी रुपयांचा डल्ला मारला.

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मेहता याने पौन याला १.७५ कोटी रुपये मे ते डिसेंबर २०२४ दरम्यान पाठवले. जानेवारी २०२५ मध्ये ५० लाख पाठवले. तर या प्रकरणात हवा असलेला आरोपी यू. अरुणचलम ऊर्फ अरुणभाईला ४० कोटी रुपये दिले आहेत. मेहता याने ७० कोटी रुपये पौन, तर ४० कोटी अरुणभाईला दिले.

logo
marathi.freepressjournal.in