माहीम किल्ल्याला नवी झळाळी: सी फूड प्लाझाला मुंबईकरांसह पर्यटकांची पसंती; माहीम-वरळी अनुभवा बोटीची सफर

माहीम किल्ल्याला नवी झळाळी: सी फूड प्लाझाला मुंबईकरांसह पर्यटकांची पसंती; माहीम-वरळी अनुभवा बोटीची सफर

ग्राहकांना सेवा पुरवताना स्वच्छतेबाबत आणि पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही

मुंबई : माहीम समुद्र किनारी 'सी फूड प्लाझा' खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. भविष्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित कुमार आंबी यांनी दिली. तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या धर्तीवर आता माहीम समुद्र ते वरळीपर्यंत बोटीची सफर करता येणार आहे. तसेच ८०० वर्षे जुन्या माहीम किल्ल्यावर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, पुढील काही वर्षांत किल्ल्याला नवी झळाळी प्राप्त होणार आहे.

मुंबईतील कोळीवाड्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करतानाच महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटीलगत सुरू करण्यात आला आहे. या सी फूड प्लाझाला भेट देणाऱ्यांची संख्या प्रत्येक आठवड्यागणिक वाढत असून, आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.

मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री दीपक केसरकर यांनी महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ संकल्पना राबविण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबईतील माहीममध्ये पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू झाला आहे. या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने पालिकेच्या नियोजन विभागाने प्रत्येक महिला बचतगटाला साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे.

अश्विनी जोशी यांच्या सूचनेनुसार, या ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन बृहन्मुंबई पालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच ५ टेबल, २० खुर्च्या, विद्युत रोषणाई, ओला आणि सुका कचरा संकलन डबे, ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी एप्रोन, हातमोजे, हेडर कॅप आदी बाबी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिला बचतगटाला दालनावर त्यांचे माहितीफलक लावलेले असतात. नोंदणीकृत कोळी महिला बचतगटांना ‘सी फूड प्लाझा’मध्ये दालन उभारणी आणि संचलनाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सेवा पुरवताना स्वच्छतेबाबत आणि पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना देखील महिला बचतगटांना महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

परिसरात पर्यटनवाढीला चालना

स्थानिक महिलांना रोजगार मिळतानाच या परिसरात पर्यटनवाढीला चालना मिळावी, याच उद्देशातून कोळी महिला बचतगटांना नियोजन विभागाने साधनसामुग्री पुरवली आहे. तसेच आर्थिक पाठबळही उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व गोष्टींचा फायदा महिला बचत गटांना दैनंदिन व्यवसायात होत असून राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे, असे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.

आठवड्याला ५०० खवय्यांची गर्दी

माहीम चौपाटीलगत कोळीवाड्यात असलेल्या या सी फूड प्लाझाला प्रत्येक आठवड्याला सरासरी ५०० जण भेट देत आहेत. २ नोव्हेंबर २०२३ रोजी शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी सदर सी फूड प्लाझाच्या ठिकाणी भेट दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in