न्यू माहीम शाळेची इमारत मजबूत! कोणाच्या तरी फायद्यासाठी इमारत पाडत असल्याचा पालक, माजी विद्यार्थ्यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेची छोटाणी रोडवर असलेली न्यू माहीम शाळेची इमारत मजबूत असून ती पाडू नये, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचे पालक, माजी विद्यार्थी तसेच या परिसरातील नागरिक शुक्रवारी शाळेबाहेर एकवटले होते. तसेच, सदर शाळेची इमारत ही कोणाच्या तरी फायद्यासाठी जाणूनबुजून पाडली जात असल्याचा आरोप येथे उपस्थित पालकांनी केला.
न्यू माहीम शाळेची इमारत मजबूत! कोणाच्या तरी फायद्यासाठी इमारत पाडत असल्याचा पालक, माजी विद्यार्थ्यांचा आरोप
Photo : Facebook (New Mahim Municipal Secondry School)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची छोटाणी रोडवर असलेली न्यू माहीम शाळेची इमारत मजबूत असून ती पाडू नये, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचे पालक, माजी विद्यार्थी तसेच या परिसरातील नागरिक शुक्रवारी शाळेबाहेर एकवटले होते. तसेच, सदर शाळेची इमारत ही कोणाच्या तरी फायद्यासाठी जाणूनबुजून पाडली जात असल्याचा आरोप येथे उपस्थित पालकांनी केला. शाळेच्या इमारतीअभावी मुलांच्या शिक्षणाचा तसेच भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची कैफियत यावेळी पालकांनी मांडली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पालिकेने या शाळेच्या इमारतीला धोकादायक इमारत असे घोषित केले आहे.

मुंबई महापालिकेच्या न्यू माहिम शाळेत सुमारे २००० हून अधिक विद्यार्थी १ ली ते दहावीचे शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी माहिम, धारावी, शाहूनगर या भागातून या ठिकाणी शिकायला येतात. दरम्यान, पालिकेने काही महिन्यांपूर्वी या शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यानंतर १७ डिसेंबर २०२४ रोजी शाळेची इमारत सी – १ धोकादायक श्रेणी म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे महापालिकेमार्फत सांगण्यात आले होते. तसेच, न्यू माहीम मनपा शालेय इमारत धोकादायक घोषित केल्यामुळे १६ जूनपासून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देऊ नये, शालेय इमारतीतील सर्व शिक्षकांनी आपापल्या तासिका तळमजल्यावरील सुरक्षित वर्गखोल्यांमध्येच घ्याव्यात, तसेच मुख्याध्यापकांनी शिपायांच्या मदतीने स्थलांतरीत करायच्या सामानाबाबत सर्व कार्यवाही करावी, जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही, असे पालिकेकडून शाळेला सांगण्यात आले.

न्यू माहीम शाळेची इमारत अतिशय मजबूत आहे. इमारतीच्या छताचे प्लास्टर उखडले गेले आहे. त्यांची दुरुस्ती केल्यास शाळेला काहीही धोका नाही. मात्र, शाळेला थेट धोकादायक घोषित करून जमीनदोस्त करण्याचा घाट घातला जात आहे.

प्रणाली राऊत, आम आदमी पक्ष

शाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे जवळच्या कपडा बाजारातील शाळेत आणि न्यू सायन या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. पालिकेच्या वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंता विभागाने दिलेल्या अहवालानंतरच शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका

logo
marathi.freepressjournal.in