पी उत्तर विभागाचे नवीन कार्यालय सेवेत ; मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण

या नवीन पी उत्तर वॉर्डच्या माध्यमातून ७ लाखांहून अधिक मालाड, कूरारवासीयांना लाभ मिळणार आहे.
पी उत्तर विभागाचे नवीन कार्यालय सेवेत ; मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : मुंबई महापालिकेचे २४ वॉर्डात आणखी एक नवीन पी उत्तर वॉर्ड मालड कुरारवासीयांच्या सेवेत आला आहे. या नवीन पी उत्तर वॉर्डच्या माध्यमातून ७ लाखांहून अधिक मालाड, कूरारवासीयांना लाभ मिळणार आहे. मालाड येथे पी उत्तर विभाग कार्यालयाचे उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील प्रभू, आमदार अतुल भातखळकर, आमदार अस्लम शेख, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पी पूर्व विभाग कार्यालय अंशतः सेवांसह कुंदनलाल सैगल नाट्यगृहात सुरू करण्यात आले असले, तरी पूर्ण क्षमतेने आणि स्वतंत्र इमारतीत हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी लोढा यांनी दिले. विविध समस्या, तक्रार निवारण या कार्यालयाच्या माध्यमातून मालाड पूर्व व कूरार परिसरातील नागरिकांना मदत होईल, असेही लोढा यांनी नमूद केले.

९ हजार ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तात्पुरती जागा

पी उत्तर विभागाचे विभाजन करून पी पूर्व आणि पी पश्चिम असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. नागरिकांची सोय व्हावी, यादृष्टिने मालाड (पूर्व) मधील रामलीला मैदान परिसरात कुंदनलाल सैगल नाट्यगृहात सध्या सुमारे ९ हजार ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तात्पुरती जागा शोधून तेथे पी पूर्व विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.

सेवा-सुविधांना प्राधान्य देण्याची गरज - खासदार गोपाळ शेट्टी

मालाड मढ ते कूरार या दोन टोकादरम्यान पसरलेल्या या विभागात नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना सहजतेने प्रशासनाच्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी पी पूर्व विभागाची गरज होती. आता या स्वतंत्र विभागाच्या निर्मितीनंतर ज्या काही गरजा आहेत, त्यांची पूर्तता करावी लागेल. विभागाच्या तात्पुरत्या कार्यालयापासून ते कायमस्वरूपी स्वतंत्र कार्यालयामध्ये स्थलांतरित होईपर्यंत नागरी सेवा-सुविधांना प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत खासदार गोपाळ शेट्टी यांनी मांडले.

७ लाख नागरिकांना लाभ - किरण दिघावकर

पी उत्तर विभाग कार्यालय पुढील सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. सध्या या कार्यालयात मेंटेनन्स, आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, डिसपॅच हे विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत. नवीन पी उत्तर विभाग कार्यालय कार्यान्वित झाल्याने ९ प्रभाग झाले असून, लोक उपयोगी सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने ७ लाख नागरिकांना याचा लाभ होईल.

- किरण दिघावकर, पी उत्तर सहाय्यक आयुक्त

logo
marathi.freepressjournal.in