गारगाई भागवणार मुंबईची अधिकची तहान,दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार!

गारगाई भागवणार मुंबईची अधिकची तहान,दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार!

मुंबईला सध्या सात धरणांतून ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे.

मुंबई : मुंबईला सध्या सात धरणांतून ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. ही अतिरिक्त पाण्याची गरज भागवण्यासाठी गारगाई धरणातून मुंबईला पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी गारगाई धरणातून उपलब्ध होणार असून यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारितील नाशिक धरण सुरक्षा समिती व आदिवासी गाव असल्याने केंद्रीय वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून प्रकल्पात बाधित घरांना जवळच पर्यायी घरे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ब्रिटिशकालीन असून वाढती लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका गारगाई धरण प्रकल्प राबवत आहे. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्प प्राध्यान्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. गारगाई प्रकल्पाच्या कामासाठी पालिकेला महाराष्ट्र शासनाच्या १२ नोव्हेंबर २०१३च्या निर्णयानुसार परवानगीही मिळाली आहे.

झाडांचे पुनर्रोपण अन् २ किमीचा बोगदा खोदणार

गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. मात्र, या प्रकल्पातून मुंबईत पाणी आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज भासणार नाही. उपलब्ध असलेल्या यंत्रणेमधूनच हे पाणी मुंबईत आणले जाईल. मोडकसागर धरणाला जोडण्यासाठी केवळ २ किमीचा बोगदा तयार करण्याचा खर्च येणार असल्याचे बांगर म्हणाले. तसेच या ठिकाणच्या लाखो झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. शिवाय या प्रकल्पात केवळ एकच संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे, तर चार गावांतील शेतजमिनीला फटका बसणार आहे. या चार गावांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याने या जागीही झाडांचे पुनर्रोपण, लागवड करणे शक्य होणार आहे.

पिंजाळ, दमणगंगा प्रकल्पही प्रस्तावित

पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी गारगाईसह पिंजाळ आणि दमणगंगा असे एकूण तीन नवीन जल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. या तीन प्रकल्पांतून मुंबईकरांसाठी प्रतिदिन वाढीव २,८९१ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.

असा आहे गारगाई प्रकल्प

नियोजित गारगाई धरण प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोऱ्याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम केले जाणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरवण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in