मलबार हिल येथे नवीन जलाशय लवकरच ६०० कोटींचा खर्च अपेक्षित; दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठ्यात वाढ

संगमरवरी दगडात हे घड्याळ असून मधला भाग धातूचा आहे
मलबार हिल येथे नवीन जलाशय लवकरच
६०० कोटींचा खर्च अपेक्षित; दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठ्यात वाढ

मुंबई : मुंबईतील ७ जलाशयापैकी मलबार हिल येथील १३५ वर्षें जुन्या ब्रिटीशकालीन जलाशयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जलाशयाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात नवीन पंपिंग स्टेशन व सब स्टेशनचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, या जलाशयामुळे दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे. या कामामुळे सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना असून, या कामासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सन १८८७ मध्ये बांधलेला जलाशय

मलबार हिल जलाशय हे फिरोजशहा मेहता उद्यान (हँगिंग गार्डन) परिसरात असून त्यातून ग्रँट रोड, ताडदेव, गिरगाव, चंदनवाडी, मंत्रालय, चर्चगेट, सीएसएमटी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. सन १८८७ मध्ये बांधलेल्या सव्वा शतकाहून अधिक काळ सेवा बजावलेल्या या जलाशयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एकूण पाच टप्प्यात हे काम चालणार असून, पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यानंतर पुढील टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

'या' भागात होणार पाणी पुरवठा

पुनर्बांधणीदरम्यान दक्षिण मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असल्याने पहिल्या टप्प्यात बाजूलाच २३ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलाशय व १४ दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नवीन जलाशय कुलाबा, फोर्ट, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड आणि ग्रॅट रोडमधील पालिकेच्या प्रभागांना पाणी पुरवठा करणार आहे.

सूर्यछाया घड्याळाची दुरुस्ती

सन १९२१ मध्ये मलबार हिल जलाशयाच्या विस्तारादरम्यान या परिसरात सूर्यकिरणांनी वेळ दाखविणारे घड्याळ उभारण्यात आले आहे. संगमरवरी दगडात हे घड्याळ असून मधला भाग धातूचा आहे. सूर्यछाया घड्याळ (सन डायल) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या घडाळ्याची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे. घड्याळात १ ते १२ असे रोमन अंक आहेत. सूर्याचा प्रकाश घडाळ्यावर पडल्यानंतर ते वेळ दाखवते. ही वेळ अगदीच तंतोतंत नसली तरी नैसर्गिक पद्धतीने वेळ दाखविणारे हे घड्याळ कुतूहलाचा विषय आहे. जलाशय पुनर्बांधणीदरम्यान या घड्याळाची दुरुस्ती करून त्याचे गतवैभव प्राप्त करून दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या हेरिटेज विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in