
शिंदे गटाच्या बंडानंतर आता शिवसेना हळूहळू सावरत असून, नेतृत्वाने पुन्हा एकदा पक्षाची नवी फळी उभारायचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षात उरलेल्या निष्ठावंतांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर सचिवपदी पराग लीलाधर डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. मुख्यमंत्रिपदाची माळही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. नेमके कोण आपल्यासोबत आहे आणि कोण नाही, याचा पत्ताच शिवसेना नेतृत्वाला लागत नव्हता; मात्र आता शिवसेना हळूहळू सावरत आहे. पक्षाची नवी फळी उभारायचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सामाजिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याकडे उपनेतेपद देण्यात आले. आता मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेल्या जुन्या नेत्यांना पक्षनेतृत्व नवीन जबाबदारी देत आहे. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेचे ते प्रवक्तेही आहेत. शिंदे गटाच्या बंडाच्या दरम्यान त्यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली होती. भास्कर जाधव यांचा विधिमंडळ कायद्यांचा चांगला अभ्यास आहे. ते नेहमीच आक्रमकपणे आपला मुद्दा मांडत असतात. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या दोघांना आता शिवसेना नेतेपद देण्यात आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांचे सुपुत्र पराग डाके यांना सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.