वरळी, अंधेरी, विक्रोळीत नवीन तरणतलाव सुरू होणार

शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना शुल्क आकारणीत विशेष सवलत
वरळी, अंधेरी, विक्रोळीत नवीन तरणतलाव सुरू होणार

मुंबई : सुदृढ आरोग्यासाठी जलतरण उत्तम व्यायाम असून वरळी, अंधेरी व विक्रोळीकरांसाठी नवीन जलतरण तलाव लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना शुल्क आकारणीत विशेष सवलत देण्यात येणार आहे. बुधवार, ६ मार्चला सकाळी ११ वाजेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे.

मुंबईकर नागरिकांना पोहण्यासाठी मनपाकडून तरणतलावांची सुविधा देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ, कोंडिविटा, अंधेरी (पूर्व), वरळी हिल जलाशय परिसर, वरळी आणि राजर्षि शाहू महाराज उद्यानाजवळ, टागोर नगर, विक्रोळी या तीन परिसरातील तरणतलावांसाठी नव्याने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

दरम्यान, ऑनलाईन नोंदणीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.

या तलावात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिलांसाठी विशेष बॅच असेल. या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी वार्षिक सभासदत्व शुल्क ६७१६ रुपये आहे. तसेच शालेय विद्यार्थिनी, ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला, महानगरपालिका महिला कर्मचारी, निवृत्त पालिका महिला कर्मचारी आणि महिला नगरसेवक यांना ४५८६ रुपये वार्षिक शुल्क आहे, असे जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले.

विद्यार्थी (वय १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत अथवा इयत्ता दहावीपर्यंत)/वरिष्ठ नागरिक (वय ६० वर्षांवरील) सभासदांना जन्मतारखेचा पुरावा सादर करावा. तसेच पालिका कर्मचारी, नगरसेवकांना पालिकेचे ओळखपत्र सादर करावे. दिव्यांगांना ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे शासनमान्य प्रमाणपत्र सादर करावे. तसेच वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यानच्या सभासदांसमवेत त्या सभासदाची जबाबदारी घेणारे पालक किंवा पालकांनी नियुक्त केलेली व्यक्ती तरणतलावाची सभासद असणे आवश्यक आहे.

असे आहे सभासद शुल्क

तीनही तरण तलावांत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ८ ८३६ वार्षिक सभासदत्व शुल्क आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात सूट देत रुपये ४५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. पुरुषांसाठी या तीनही तरण तलावात पोहण्याची वेळ सकाळी ६ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० अशी असेल.

logo
marathi.freepressjournal.in