नववर्ष स्वागतासाठी बेस्ट सज्ज; प्रवाशांसाठी २५ जादा बस उपलब्ध होणार

नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर रात्री एकूण २५ जादा बस सोडण्यात येणार आहेत.
नववर्ष स्वागतासाठी बेस्ट सज्ज; प्रवाशांसाठी २५ जादा बस उपलब्ध होणार
Published on

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर रात्री एकूण २५ जादा बस सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, गर्दीचा अंदाज घेऊन आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमातर्फे ३१ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक तसेच प्रेक्षणिय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडविण्याच्या हेतूने हेरिटेज टूर चालविण्यात येणार आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) - गेट वे ऑफ इडिया - मंत्रालय एनसीपीए नरिमन पॉइंट विल्सन कॉलेज नटराज हॉटेल चर्चगेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुतात्मा चौक रिझर्व्ह बँक ओल्ड कस्टम हाऊस म्युझियम या मार्गावर सकाळी १० ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत प्रत्येकी ४५ मिनिटांच्या प्रस्थानानंतर सदर बस प्रवर्तित करण्यात येतील. हेरिटेज टूरसाठी वरच्या मजल्यासाठी प्रत्येकी रु. १५०/- व खालच्या मजल्यावर प्रत्येकी रु. ७५/- तिकीट दर आकारण्यात येणार आहे, असे बेस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या मार्गावर धावणार जादा बस

ए२१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार

सी८६ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्रे आगार

ए ११२ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते चर्चगेट स्थानक (पूर्व)

ए ११६ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

२०३ - अंधेरी स्थानक पश्चिम ते जुहू चौपाटी

२३१ - सांताक्रुझ स्थानक पश्चिम ते जुहू बस स्थानक

ए २४७ व ए २९४ - बोरिवली बस स्थानक ते गोराई खाडी

२७२ - मालाड स्थानक पश्चिम ते मार्वे चौपाटी

logo
marathi.freepressjournal.in