आज सगळीकडे झिंग झिंग झिंगाट! थर्टी फर्स्टसाठी हॉटेल, रिसॉर्ट्स, समुद्रकिनारे फुल्ल; तळीरामांचा उत्साह शिगेला

New Year 2025 : जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण ‘थर्टी फर्स्ट’ जल्लोषात साजरा करत असतात. त्यामुळे सोमवारपासून सर्वत्र झिंग झिंग झिंगाटची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
आज सगळीकडे झिंग झिंग झिंगाट! थर्टी फर्स्टसाठी हॉटेल, रिसॉर्ट्स, समुद्रकिनारे फुल्ल; तळीरामांचा उत्साह शिगेला
Published on

मुंबई : डिसेंबर महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते ‘थर्टी फर्स्ट’ म्हणजेच नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीचे. एव्हाना अनेकांचे प्लानिंग पक्के होऊन त्यांच्या पार्टीची प्राथमिक तयारी सुरू झाली असेल, पण सध्या प्रत्येक नाक्यावर, गल्ल्यागल्ल्यांमध्ये, ऑफिसमध्ये, व्हॉट्सॲॅप ग्रुपवर एकच चर्चा आहे ती म्हणजे थर्टी फर्स्टचा काय प्लान आहे? मंगळवारी २०२४ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच थर्टी फर्स्टसाठी सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट‌्स, समुद्रकिनारे फुल्ल झाले असून तळीरामांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक मुंबईकरांनी, तर थर्टी फर्स्ट साजरे करण्यासाठी केव्हाच मुंबईबाहेर धाव घेतली आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्वत्र झिंग झिंग झिंगाटची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण ‘थर्टी फर्स्ट’ जल्लोषात साजरा करत असतात. काहींनी घरातच कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रिणींसह सेलिब्रेशनचा प्लान ठरवला असेल, तर काहींनी हॉटेल, रिसॉर्टमध्ये जाऊन न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवले असेल. त्यापैकी अनेकांची पार्टी ही ओली, अर्थात मद्यपानाची असते. थर्टी फर्स्ट म्हटले की, तळीरामांचा उत्साह शिगेला पोहोचतो. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. ३१ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत दारू मिळणार असल्याने मद्यप्रेमींना आतापासूनच थर्टी फर्स्टची झिंग चढू लागली आहे. बिअर/वाइन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री १ वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे, तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आधीच ‘स्टॉक’ करण्याची गरज लागणार नाही.

यंदा नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवार, रविवार विकेंड आणि त्यानंतर मधला सोमवारचा दिवस वगळता मंगळवारी थर्टी फर्स्ट असा लाँग विकेंड आला आहे. या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईजवळील पर्यटकांची आवडती ठिकाणे अलिबाग, मुरूड-जंजिरा, रायगड, वसई-विरार तसेच लोणावळा, खंडाळ्यासह सर्वच ठिकाणची पर्यटनस्थळांवर शनिवारपासूनच गर्दी झाली आहे. येथील हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्महाऊस, खासगी बंगले, सेनेटोरियम तसेच कृषी पर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंगही हाऊसफुल्ल झाली आहे.

फक्त चार पेगच!

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करताना लोकांना संपूर्ण रात्र पार्टी करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, ३१ डिसेंबरच्या फुलनाइट पार्टीदरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी हॉटेल असोसिएशनने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ४ पेगनंतर दारू मिळणार नसल्याचे धोरण हॉटेल असोसिएशनने आखले आहे. असोसिएशनने ग्राहकांना दारू देताना त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्रे तपासण्याची आणि मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची योजना आखली आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

थर्टी फर्स्टनिमित्त रंगणाऱ्या पार्ट्यांनंतर तळीरामांना आवरण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुंबईत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी उशिरापर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याचीही शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंगळवारचा उपवास करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण

मार्गशीर्ष महिना संपला असून मंगळवारपासून पौष मासारंभ सुरू होणार आहे. त्यामुळे महिनाभर उपवास ठेवलेल्यांना आता मोकळे रान मिळणार आहे. मात्र, अनेक जण मंगळवारचा उपवास धरतात. नेमका मंगळवारीच थर्टी फर्स्ट आल्याने उपवास करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे, पण तरीही त्यापैकी काही शौकिनांनी मंगळवारी रात्री १२ नंतर थर्टी फर्स्टच्या पार्टीचा आनंद लुटण्याचे प्लानिंग केले आहे. त्यामुळे अनेक जण रात्री १२ वाजल्यानंतर झिंगाट होण्याचे बेत आखत आहेत.

मुंबईत उशिरापर्यंत लोकल वाहतुकीची सुविधा

३१ डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे. कारण मंगळवारी रात्री पश्चिम आणि मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारी पहाटेपर्यंत अतिरिक्त लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर ८ अतिरिक्त लोकल चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत. तर मध्य रेल्वेवर ४ अतिरिक्त लोकल धावमार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in