
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असून शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे तेरा हजार पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनासाठी मुंबईसह वाहतूक पोलिस बंदोबस्तकामी कार्यरत असतील. त्यात आठ अतिरिक्त आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी, १२ हजार ०४८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, एटीएस, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लघंन आणि ड्रंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
सीसीटीव्हीद्वारे निगराणी
शहरातील विविध रेल्वे स्थानके, शासकीय-निमशासकीय इमारती, मंदिर, गर्दीच्या ठिकाणी विशेषत: गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई चौपाटी, पवई तलाव आणि इतर धार्मिक ठिकाणी तसेच राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल, गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे.