
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतागृहातील कचराकुंडीत नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
पोलिसांनी विमानतळात एक दिवसाचे बाळ कचरा कुंडीत टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. हे विमानतळ शहराच्या सहार भागात असलेल्या टी-२ टर्मिनलमध्ये स्थित आहे.
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास विमानतळ सुरक्षा दलाला स्वच्छतागृहाच्या कचराकुंडीत नवजात अर्भक आढळल्याची माहिती मिळाली. बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून पुरावे गोळा केले जात आहेत.