नवनियुक्त पालिका आयुक्तांचे आदेश : पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा, नाल्यातील गाळ काढा; धोकादायक इमारती रिकाम्या करा!

पुढील दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी...
नवनियुक्त पालिका आयुक्तांचे आदेश : पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा, नाल्यातील गाळ काढा; धोकादायक इमारती रिकाम्या करा!

मुंबई : पुढील दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त रस्ते, मे अखेरपर्यंत नाल्यातील गाळ उपसा करणे, मध्य, पश्चिम रेल्वे, मेट्रो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासह अन्य शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करा, असे आदेश नवनियुक्त पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिले.

पावसाळी उपाययोजनांत नाल्यांचे खोलीकरण करून गाळ काढण्यात यावा तसेच नदी, नाले परिसरातील रहिवासी भागांत पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. सखल भागांमधील उदंचन केंद्राची यंत्रणा सातत्याने देखभाल करावी, मुंबई महानगरात सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे, द्रूतगती मार्गाची कामे, नियोजित रस्त्यांची कामे विविध ठिकाणी सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच रस्त्यांची ठिकठिकाणी सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. खड्डे भरण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देशही डॉ. गगराणी यांनी दिले.

पर्जन्य जलवाहिनी, रस्ते आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्य आणि पावसाळा पूर्वतयारी आदींचा आढावा भूषण गगराणी यांनी पालिका मुख्यालयात घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, संचालक, सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता, खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

धोकादायक इमारती रिकाम्या करा!

मुंबईतील आपत्कालीन व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रक्रियेनुसार संबंधित इमारती रिकाम्या करा. जुहू चौपाटी परिसरात निगराणी, मनोऱ्यांची संख्या वाढवावी, तसेच आपत्कालीन संवाद यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही आयुक्त यावेळी दिले.

आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा

विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ. गगराणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजीत बांगर, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील नियंत्रण कक्षाला भेट देऊन विविध आपत्कालीन उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in